T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, संजू सॅमसनला संधी, रिंकू सिंग बाहेर, हार्दिक पांड्या उपकर्णधार


प्रतिक्षा आणि अनुमानांचे तास संपले आहेत. कारण, टीम इंडियाने आता T20 विश्वचषक 2024 साठी आपल्या 15 खेळाडूंच्या नावांना मंजुरी दिली आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही खेळाडूंच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावली. निवडकर्त्यांनी कर्णधार आणि प्रशिक्षकाशी बोलूनच खेळाडूंच्या नावांना मंजुरी दिली. आता केवळ 15 खेळाडूंची निवड करायची असल्याने टी-20 विश्वचषक 2024 च्या फ्लाइटमध्ये सर्वांनाच स्थान मिळू शकले नाही, त्यामुळे काही खेळाडूंची निराशा झाली.

हे फार पूर्वीच स्पष्ट झाले आहे की, 2024 च्या टी-20 विश्वचषकात संघाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हाती असेल. निवडीमुळे हार्दिक पांड्या संघाचा उपकर्णधार असेल, हे स्पष्ट झाले. भारतीय निवड समितीने संजू सॅमसनवर विश्वास व्यक्त केला आणि त्याला केएल राहुलपेक्षा प्राधान्य दिले. केएल राहुलला T20 विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. रिंकू सिंगही संघाबाहेर आहे. त्याच्या जागी शिवम दुबेला संधी मिळाली आहे.

भारतीय फलंदाजीची जबाबदारी पूर्णपणे रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली यांच्या खांद्यावर असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल. फिरकी विभागात युझवेंद्र चहलचे पुनरागमन झाले आहे. म्हणजेच कुलचा जोडी 2024 च्या टी-20 विश्वचषकात पुन्हा धुमाकूळ घालताना दिसणार आहे. याशिवाय हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा हे खेळाडू संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहेत.


T20 विश्वचषक 2024 या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, यामध्ये भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 29 जूनपर्यंत चालणाऱ्या या ICC स्पर्धेत 9 जून रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. यावेळी प्रथमच 20 संघ T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत असून, त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत स्पर्धेच्या अ गटाचा भाग आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे.

T20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडिया – रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.