
चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ घालवणारे डॅनी डेंगझोंपा आज 76 वर्षांचे झाले. डॅनी डेंगझोंपा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. 1972 मध्ये त्यांनी नेहरू या चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. पण त्यांच्या करिअरमध्ये एक काळ असा आला होता, जेव्हा डॅनी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता. एकापाठोपाठ एक त्यांनी अमिताभ यांच्यासोबत देऊ केलेल्या चार भूमिका नाकारल्या. यामागे एक भीती होती, ज्याचा उल्लेख त्यांनीच काही वर्षांपूर्वी केला होता.
त्या भीतीमुळे डॅनी डेंगझोंपांना नाकारले होते अमिताभ बच्चन यांचे 4 चित्रपट
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत डॅनी डेंगझोंपा म्हणाले होते, मी अमितजींसोबत काम करण्यापासून स्वत:ला थांबवायला सुरुवात केली होती. मला विश्वास होता की त्यांना उत्तम भूमिका मिळतात. जर मी त्यांच्याबरोबर त्याच फ्रेममध्ये असेल, तर कोणीही माझ्याकडे लक्ष देणार नाही. चित्रपट यशस्वी झाला, तर त्याचे सर्व श्रेय त्यांना जाईल. जर ते यशस्वी झाले नाही, तर जबाबदारी नवीन मुलावर टाकली जाईल.
त्यादरम्यान डॅनी डेंगझोंपा यांनी दावा केला होता की, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत चार चित्रपटांची ऑफर दिली होती. पण डॅनी यांनी सर्वच चित्रपटात काम करण्यास नकार दिला. या चित्रपटांमध्ये कुली आणि मर्द या चित्रपटांचाही समावेश होता. हे दोन्ही चित्रपट बनले आणि प्रदर्शित झाले आणि सुपरहिट ठरले.
मात्र, नंतर डॅनी डेंगझोंपा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अग्निपथ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच बिग बींसोबत स्क्रीन शेअर केली. यात त्यांनी साकारलेली कांचा चीनाची भूमिका आजही लोकांच्या मनात कायम आहे. यानंतर ते 1991 चा हम, 1992 चा खुदा गवाह, 1999 चा कोहराम, 2004 चा अब तुम्हारे हवाले वतन साथियों आणि 2022 चा ऊंचाई यांसारख्या अनेक चित्रपटात एकत्र दिसले.
