दंगल फेम सुहानी भटनागरचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन, साकारली होती आमिर खानच्या मुलीची भूमिका


बॉलिवूडचा यशस्वी चित्रपट दंगलमध्ये बबिता कुमारीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्यावर फरिदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. दंगल चित्रपटातून तिने लोकप्रियता मिळवली आणि तिच्या चुलबुली अभिनयाने सर्वांना प्रभावित केले.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून एम्समध्ये उपचार घेत होती. तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. तिच्या उपचारासाठी ती औषधेही घेत होती. मात्र औषधांच्या रिॲक्शनमुळे तिच्या पायात पाणी भरले. फरिदाबाद येथील सेक्टर 15 येथील अजरौंडा स्मशानभूमीत या अभिनेत्रीचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ही अभिनेत्री वयाच्या 11 व्या वर्षी आमिर खानच्या दंगल चित्रपटात बबिता फोगटच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेत ती खूप पसंत केली गेली होती. या चित्रपटातील बापू सेहत लिए तू तो हानिकारक है या लोकप्रिय गाण्यातही ती होती. या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्राने बबिता फोगटची तरुणाईची भूमिका साकारली होती.

या अभिनेत्रीने देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात काम केले. तिने आमिर खानसह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले होते. मात्र त्यानंतरही ती लाइमलाइटपासून दूरच राहिली. ती सोशल मीडियावरही होती, पण नोव्हेंबर 2021 पासून ती सक्रिय नव्हती. अभिनेत्री 19 वर्षांची होती आणि तिचे तेव्हाचे आणि आताचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देशातच नाही, तर जगभरात पाहिला गेला. जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात 2024 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते.