PAK vs SA : मैदानातच भिडले मोहम्मद रिझवान आणि मार्को यानसेन, झेल सुटल्यानंतर चौकार मारला गेला आणि मग सुरू झाला वाद


एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 26व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसेन यांच्यात जोरदार वादावादी झाली. रिझवानने चांगली सुरुवात केली, पण 31 धावा करून तो बाद झाला. त्याचवेळी यानसेनने या सामन्यातही चांगली सुरुवात करत पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या सहा षटकांत एक गडी गमावून 38 धावा केल्या. यानंतर मार्को यानसेन आपल्या स्पेलचे चौथे षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही, तिसऱ्या चेंडूवर इमामने चौकार मारण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीरक्षक क्लासेनकडे झेलबाद झाला. नवा फलंदाज रिझवान पहिल्याच चेंडूवर बाद होऊ शकला असता. त्याचा झेल यानसेनने हुकवला. पुढच्या चेंडूवर रिझवानने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि सीमारेषेबाहेर गेला. यानंतर यानसेन आणि रिजवान यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर रिझवानने वेगाने धावा केल्या, मात्र गेराल्ड कोएत्झीने त्याला डी कॉककरवी झेलबाद केले.

या सामन्यात रिजवान 27 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला. रिझवानशिवाय पाकिस्तानचे अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनाही विशेष काही करता आले नाही. शफिक नऊ धावा करून तर इमाम 12 धावा करून बाद झाला. इफ्तिखारने 21 धावा केल्या.

पाकिस्तानसाठी हा विश्वचषक काही खास नाही. पहिल्या सामन्यात नेदरलँड्स आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर या संघाने सलग तीन सामने गमावले आहेत. भारतानंतर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताननेही पाकिस्तानचा पराभव केला. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तान संघाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.