वादग्रस्त विधाने नकोत – मोदींचा सल्ला

मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या किंवा रा.लो आघाडीच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने टाळावीत, असे आवाहन भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते काल मुंबईत बोलत होते. काही लोक स्वत:ला भारतीय जनता पार्टीचे हितचिंतक मानतात, परंतु उत्साहाच्या भरात भाजपालाच अडचणीत आणणारी विधाने करतात असे नरेंद्र मोदी म्हणाले. विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रविण तोगडिया यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भात मोदी बोलत होते. 

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरमधून हा सल्ला दिला. सकाळीच दिलेल्या आपल्या ट्विटमध्ये त्यांनी अशा लोकांच्या या विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली. सुशासन आणि विकास या दोन मुद्यांवर निवडणूक होत आहे आणि सत्ताधारी कॉंग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे. अशा अवस्थेत या दोन मुद्यांवरचे लोकांचे लक्ष विचलित होईल अशी विधाने करणे टाळले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.

असे विषय उपस्थित होऊन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला तर तो कॉंग्रेसला हवाच आहे. म्हणजे ही विपरीत विधाने करणारे लोक कॉंग्रेसचा फायदाच करून देत आहेत असे मोदी यांनी आपल्या ट्विटरमध्ये नमूद केले आहे.