हामीद मीर हल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील वरीष्ठ पत्रकार हामीद मीर यांच्यावर गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हल्याची जबाबदारी तहरिक ए तालिबान पाकिस्तान संघटनेने स्वीकारली असून ट्वीटरवर त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुन्नी दहशतवादी समूह लष्कर ए झांगड यांच्या मदतीने मीर यांच्यावर हा हल्ला केला गेला आहे.

हल्ल्यामागचे कारण देताना तालिबानला मीर यांच्याकडून होत असलेला विरोध, त्यांचा धर्मनिरपेक्षतावाद तसेच हामीद यांनी मलाला युसुफजाई या मुलीच्या कृत्याचे केलेले समर्थन यामुळे हल्ला केल्याचे सांगितले आहे. मीर यांच्यावर कराची एअरपोर्टवरून परतत असताना चार बंदूकधार्‍यांनी वाहनांवर येऊन हल्ला केला होता. मीर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत मात्र त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे रूग्णालयातून सांगितले गेले आहे.

या हल्ल्यामुळे पाकिस्तानातील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून त्या संदर्भात पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी रविवारी राजकीय पक्ष व उच्चाधिकार्‍यांची एक बैठकही घेतली असल्याचे समजते. सिंध प्रांताचे सूचना मंत्री शर्जील मेमन यांनी हल्लेखोरांची माहिती देणार्‍यांना ५ कोटी रूपयांचे इनाम जाहीर केले आहे.