नाशिक – शिवसेनेतून एकटा बाहेर पडलो, कुणालाही फोडले नाही, तरीही शिवसेनेची मंडळी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे बोलतात मग छगन भुजबळ सेनेच्या आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडले. सत्तेत गेल्यावर बाळासाहेबांची टिंगल करू लागले,अशांना मातोश्रीवर जेवायला कसे बोलवतात असा सवाल मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी येथे केला.
नाशिकमध्ये आयोजित जाहीर सभेत राज यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली.ते म्हणाले ,छगन भुजबळांनी शिवसेना फोडली, शिवसेनाप्रमुखांना अटकेसाठी खटला भरला, गृहमंत्री असताना त्यांचा अपमानास्पद ‘टी. बाळू’ असा उल्लेख करून शिवसेनाप्रमुखांचा अवमान केला, त्यांना अटक केली, अशा भुजबळांना उद्धव ठाकरे यांनी घरी नेऊन जेवू घातले. हे कसे काय असा सवालही त्यांनी केला.
भुजबळांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले ,पाच वर्षांपूर्वीच्या 21 कोटींवरून 2445 कोटींपर्यंत संपत्ती जमवणार्या छगन भुजबळांची चौकशी सुरू आहेच, पण इंडोनेशियात कोळसा खाणींसह सिंगापुरात गुन्हा दाखल असलेल्या भुजबळांनी स्वतःच्या संपत्तीवर कुटुंबातील सदस्यांची नावे टाकून स्वतःचा जीव वाचविण्याची धडपड चालविली आहे. महात्मा फुले यांच्या नावाने राजकारण करणा-या भुजबळांनी आपल्या शिक्षणसंस्थेला फुलेंचे नाव का नाही दिले, असा सवाल केला.