मुंबईतही मतदारयादीत घोळच !

मुंबई  –  पुण्यापाठोपाठ  औरंगाबाद आणि आता मुंबईतील काही मतदारसंघातील मतदार याद्यांत  घोळ असल्यचे समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असताना हा गोंधळ सुरू झाल्याने मतदारांत नाराजी आहे.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. राज्यात दुस-या टप्प्यात झालेल्या मतदाना वेळी अनेक ठिकाणी मतदार याद्यांतून मतदारांची नावेच गायब झाल्याचे समोर आले होते. त्याचा सर्वात मोठा फटका पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांना बसला . त्यानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबईकरांनी मतदार याद्यातील आपली नावे तपासून पाहिली. त्यात  त्यांना धक्काच बसला आहे.  अनेक जणांच्या नावात बदल झाला आहे. अनेकांची आडनावे आणि पत्ते बदलल्याचे स्पष्ट झाले  आहे. काहींच्या वयात प्रचंड तफावत आहे.अनेकांची छायाचित्रेही सारखीच आहेत. 

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात असे प्रकार उघडकीस  आले आहेत. शिवस्मृती गृहनिर्माण सोसायटीत २० मतदार आहेत. मात्र त्यात ३० जणांची नावे नोंदवण्यात आली आहेत. १ ते २० नावेही सोसायटीतील आहेत. मात्र २१ ते ३० क्रमांकाची नावे अपरिचित असल्याचे समोर आले आहे. याबाबत रितसर निवडणूक निर्णय अधिका-याकडे तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय २१ ते ३० क्रमांकावर असलेल्या व्यक्तींची नावे गोरेगाव विधानसभेच्या यादीच्या ‘भाग ९२’मध्ये आहेत.