औरंगाबाद – पुण्यात मतदानाच्या दिवशी इलेक्शन कार्ड असतानाही मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागल्याने जिल्हाधिकार्यांना घेराव घालून मतदार संतप्त झाल्याची घटना ताजी असताना औरंगाबादमध्येही नागरिक मतदारयादी तपासताना नावेच ‘ गायब’ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
येत्या २४ तारखेला औरंगाबादला मतदान होणार आहे मात्र आधार कार्ड आणि आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकांनी जिल्हाधिकार्यांना घेराव घातला. पुणे लोकसभा मतदारसंघात मतदार यादीत नावे नसल्यामुळे सुमारे एक लाख मतदारांना मतदान करता आले नव्हते. अशीच परिस्थिती औरंगाबादमध्येही आहे .
औरंगाबादमधील बयाजीपुरा या भागातील काही मतदारांना आपले नावे मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे संतप्त मतदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधार कार्ड आणि आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही मतदार यादीत नाव आले नसल्याची या मतदारांची तक्रार आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. औरंगाबाद शहरातील एका भागात हा प्रकार लक्षात आला आहे. असे अनेक प्रकरण असण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.