भारतीय गोलंदाजांचा धुमाकूळ, पाकिस्तानचा डाव 191 धावांवर आटोपला


आयसीसी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाच्या घातक गोलंदाजीपुढे पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करली. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी हळूहळू आपली जादू दाखवायला सुरुवात केली. बाबर आझम (50) निश्चितपणे अर्धशतक झळकावले, पण तो आणि रिझवान (49) यांच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

दरम्यान पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध 191 धावांवर गारद झाला आहे. 43व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने हरिस रौफला एलबीडब्ल्यू केले. जडेजाचा चेंडू हारिसला थेट त्याच्या पॅडवर लागला. पुन्हा एकदा अंपायर मॉरिस इरास्मस यांनी आऊट घोषित केले नाही. कर्णधार रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू भारताच्या बाजूने आला आणि हरिस बाद झाला. त्याला सहा चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी 10 चेंडूत दोन धावांवर नाबाद राहिला.

टीम इंडियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर हा एकमेव असा होता ज्याला एकही यश मिळाले नाही.

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने 36, अब्दुल्ला शफीकने 20 आणि हसन अलीने 12 धावा केल्या. याशिवाय सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शादाब खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाला.