मुंबई: आगामी काळात म्हणजेच सहा महिन्यांनतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. या निवडणूकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यास राज ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव-राज एकत्र येऊही शकतात, असे संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत.
यावेळी मुलाखती दरम्यान बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माझ्यात कुठलेही घरगुती वाद नाहीत. केवळ राजकीय मतभेद आहेत; भविष्य काळात कदाचित आम्ही एकत्र येऊही शकतो. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याची अथवा न येण्याची इतरांनी मुळीच काळजी करु नये.’
या लोकसभा निवडणूकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं यांना आपला पाठिंबा आहे. निवडून येणारे आपले खासदार त्यांना बिनशर्त पाठिंबा देतील. आपला पाठिंबा भाजपाला नाही व राजनाथ सिंहांना आपण महत्त्व देत नाही, याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला. भाजपच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी ही खेळी खेळल्याचे बोलले जात असले तरी मी मला पाहिजे त्या ठिकाणी उमेदवार दिल्याचे यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.