प्रतिष्ठीत नोबेल पुरस्कारात विज्ञान विभागात दिल्या जाणार्या पुरस्कारांसाठी प्रतीक्षेचा कालावधी आता २० वर्षांवर नेण्यात आला असल्याचे समजते. याचाच अर्थ असा की वैज्ञानिकांनी एखादा शोध लावल्यानंतर त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यासाठी २० वर्षे वाट पाहावी लागणार आहे. वैज्ञानिक जगतातून या संदर्भात नाराजीही व्यक्त केली जात आहे.
फिनलंड च्या आल्टो विश्वविद्यापीठातील प्रा. सँटो फॉर्च्यूनोटो म्हणाले की हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. त्यामुळे अनेक वैज्ञानिक त्यांचे शोध पुरस्कारयोग्य असूनही हा पुरस्कार मिळवू शकणार नाहीत. नोबेल फौंडेशनचा कालावधी वाढविण्याच्या या निर्णयामुळे अनेक वैज्ञानिक संस्थांची अवहेलना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण शोध लागल्यानंतर २० वर्षे प्रतीक्षा हा फार मोठा कालावधी आहे.कदाचित त्या वेळेपर्यंत शोधकर्ते जिवंत ही असणार नाहीत.
वैज्ञानिकानी एखादा शोध लागल्यानंतर प्रत्यक्षात नोबेल पुरस्कार खूपच उशीरा दिला जाण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. भारतीय वंशाचे अमेरिकी खगोल आणि पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांनी १९३० सालातच नक्षत्र रचना उघड करून दाखविली होती मात्र त्यांना नोबेल मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली आणि तो पुरस्कार पदार्थविज्ञानासाठी त्यांना दिला गेला होता.