पुणे – पुण्यातल्या मतदार याद्यातून हजारो नावे गायब होण्याच्या प्रकाराची चौकशी करावी आणि पुणे लोकसभा मतदारसंघातली निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली असून या मागणीसाठी भाजपाचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणावरून जनतेत मोठाच असंतोष पसरला आहे.
पुण्यातली किमान एक लाख नावे बाद झाली असून हे लोक आता सरकारकडे आपली नावे कशी बाद झाली याची चौकशी करण्याची मागणी करीत आहेत. या शिवाय पुण्यात अनेक ठिकाणी दोषपूर्ण यंत्रे वापरली गेली आहेत. त्यांचीही चौकशी व्हावी अशी लोकांची मागणी आहे.
या दोषाची खबर मिळताच निवडणूक आयोगाच्या निरीक्षकानी पाहणी केली आणि दोषपूर्ण मतदान झालेल्या मतदारांना पुन्हा मतदान करण्याची अनुमती दिली. एकूण २८ जणांना ही संधी मिळाली. पुण्यातले मतदारयाद्यातले घोळ का झाले याची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन या निरीक्षकांनी दिले.