मुंबई – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली की पुन्हा टोलचा विषय हाती घेणारच आहे, आंदोलनही ठरले आहे पण वादळ सांगून येत नाही, असा इशारा मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईत एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळी उत्तरे देताना टोल आंदोलनाबाबत भूमिका विशद केली. ते म्हणाले टोल आंदोलन सोडलेले नाही, आचारसंहिता संपायची वाट पाहातोय. पुढच्या आंदोलनाची दिशा काय? यावर बोलताना वादळ सांगून येत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आम आदमी पार्टीचे मॉडेल मला नको, मी बाळासाहेबांशी कधीच तुलना करत नाही, माझी तेवढी लायकी नाही, ब्ल्यू प्रिंट येत्या ऑगस्टमध्ये येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिलेल्या ‘मनसेने भाजपत विलीन व्हावे’ या सल्ल्याचाही राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. ‘आपला पाठिंबा मोदींना आहे, तो राजनाथ सिंहांना नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘तो’विषय सोडून द्या- खंजीर खुपसणे हे जेव्हा ‘त्यांनी’ काढले, तेव्हाच मी चिकन-सूप, तेलकट वड्याचे बोललो, राज-उद्धव एकत्र यावे का, हा विषय माध्यमांनी सोडून द्यावा, माध्यमांनी त्याची चिंता सोडावी, दोन वेगवेगळे पक्ष आहेत, याची आठवण राज ठाकरे यांनी करुन दिली.मनसेचे उमेदवार उभे करा म्हणून धनंजय मुंडे भेटीला आले होते, मात्र त्या ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत, माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका,असेही ते म्हणाले. चार दिवसांपूर्वी मनसेला महायुतीत स्थान नसल्याचे गोपिनाथ मुंडे यांनी म्हटले होते. मात्र याच मुंडेंनी मला फोन करून बीडमध्ये पाठिंब्याची मागणी केली. मीही लगेच लपून-छपून नव्हे तर उघड पाठिंबा दिला. असे राज ठाकरे म्हणाले.