मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी मंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या सुमारे दोन हजार पोलिसांना निवडणूक आयोगाने निवडणूक कामकाजावर तैनात केले आहे,मात्र आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींसाठी अवाजवी सुरक्षा व्यवस्था असल्याचे तर स्पष्ट झाले आहे,शिवाय पाच महत्वाच्या मंत्र्यांसाठी प्रत्येकी २३ पोलिस सुरक्षेसाठी ‘खडा पहारा ‘देत असल्याचेही माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
निवडणूक आयोगाने व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींची अतिरिक्त सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेत तशी अंमलबजावणी केल्याने अवाजवी सुरक्षेच्या कामातून मुक्त झालेले सुमारे 2 हजार पोलीस, निवडणूक कामासाठी सज्ज झाले आहेत. आमदार – खासदार, मंत्री, फिल्मस्टार्स आणि व्हीव्हीआयपी लोकांना अतिरिक्त सुरक्षा असल्याचे , निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले होते . त्यात माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केलेल्या अर्जात सध्या 5 मंत्र्यांसाठी 119 म्हणजे प्रत्येकी 23 सुरक्षा रक्षक काम करत असल्याचे तसेच अन्य व्हीआयपी मंडळीं त्यांचे बंगले ,सभा यासह अन्य कामांसाठी अवाजवी सुरक्षा असल्याचे स्पष्ट झाले होते त्यानुसार अशी सुरक्षा काढण्याचा निर्णय आयोगाने घेतला.महाराष्ट्रातील काही भाग आणि मुंबईत 17 आणि 24 एप्रिलला मतदान होत आहे.