शिवसेनेने कोकणासाठी केले तरी काय ? – राणे

रत्नागिरी – फयान आले ,त्या वेळी शिवसेनेतील कोण नेता आला? कोकणावर संकट आले की शिवसेना-भाजपमधील कोणीही येत नाही, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कोकणातील सण, संस्कृती तरी यांना माहीत आहे का ? असा सवाल करून कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. 

रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात घेतलेल्या मच्छिमार मेळाव्यात राणे बोलत होते.ते म्हणाले ,३९ वर्षे आपण शिवसेनेत होतो. त्यामुळे आपल्याला सर्व माहिती आहे. उद्धव ठाकरेंना मच्छीमार, बागायतदारांचे प्रश्न माहीत नाहीत. ते विकासावर काय बोलणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.शिवाय उद्धव ठाकरे यांनी येथे येऊन कोणते विषय मांडले? त्यांना मच्छीमारांचे प्रश्न माहीत आहेत? गाळ कसा काढावा ते माहीत आहे? दुष्काळासाठी कशी मदत करावी माहीत आहे? प्रक्रिया युनिट कसे असावेत यावर चर्चा केली का? अशी प्रश्नावलीही त्यांनी यावेळी मांडली .  

उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.  अशा प्रकारची विचारसरणी, अभ्यास त्यांच्याकडे नाही. जसा जूनमध्ये पाऊस आल्यावर बेडूक बाहेर येतात, तशी निवडणूक आली की हे बिळातून बाहेर येतात.अशा शब्दात त्यांनी तोंडसुख घेतले. उद्धव ठाकरे यांना ड्रेझर म्हणजे काय, हे तरी माहीत आहे का? एक-दोन मासे माहिती असतील. फयान आले त्या वेळी शिवसेनेतील कोण नेता आला? कोकणावर संकट आले की शिवसेना-भाजपमधील कोणीही येत नाही, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. 

कोकणातील सण, संस्कृती तरी यांना माहीत आहे का, असा टोलाही राणे यांनी या वेळी हाणला. यावेळी    सिंधुदुर्गमध्ये जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमदार दीपक केसरकर यांच्या सोबत जातील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही राष्ट्रवादीच्यावतीने राणेंनी स्पष्ट केले.