कॉंग्रेसचे महिला धोरण ?… ‘युवराजां’चे मौनव्रत !

लातूर – प्रचाराच्या आखाड्यात भाजपचे पर्यायाने नरेंद्र मोदी यांचे महिला धोरण कसे फसवे आहे, अशी टीका करणाऱ्या कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी मात्र लातूरमध्ये मौनव्रत धारण केले. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या कल्पना गिरी यांच्या हत्या प्रकरणावर  सोईस्करपणे  बोलणे टाळले.त्यामुळे तोच विषय चर्चेचा ठरला आहे.  

एका महिलेची हेरगीरी करण्यासाठी गुजरातमधील सर्व यंत्रणा  मोदींनी लावली,भाजपमध्ये महिलांचा योग्य सन्मान होत नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपच्या महिला धोरणावर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी त्यांनी लातूर मधील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या कल्पना गिरी यांच्या हत्या प्रकरणावर बोलणे सोईस्करपणे टाळले.लातूरमध्ये आज राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत कल्पना गिरी हत्या प्रकरणावर  ते काय बोलणार याकडे  सर्वांचे लक्ष होते. 

मात्र राहुल गांधींनी आपल्या भाषणात कल्पना गिरी यांचा साधा उल्लेखही केला नाही की त्यांच्या कुटुंबियांची भेटही घेतली नाही.कल्पना गिरी या लातूर  युवक कॉंग्रेसच्या पदाधिकारी होत्या. काही दिवसांपुर्वीच कल्पना गिरीचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली. कल्पनावर बलात्कार केल्याचा आरोप गिरी कुटुंबियांनी केला आहे.