लाहोर – मुसा खान या नऊ महिन्याच्या चिमुकल्याला पाकिस्तानमध्ये खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच बालकाची हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाक पोलिसांनी नऊ महिन्याच्या बालकाला हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती आणि न्यायालयामध्ये हजर केले होते . न्यायालयाने या बालकालाचा जामीन शेवटी मंजूर केला. पोलिसांनी त्यामुळे आता नऊ महिन्यांच्या मुसाचे नाव एफआयआर मधून वगळण्यात आले आहे.
पाकिस्तानी कायद्यानुसार, वय वर्षे सातपर्यंतच्या बालकाने केलेल्या कृत्याला गुन्हा मानता येत नाही. पोलिसांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांसह यासिन खान यांच्या घरावर एक फेब्रुवारी रोजी छापा घातला होता. गॅस चोरीच्या आरोपावरुन हा छापा टाकण्यात आला होता. छापा टाकण्यावेळी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपात मुसासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांनी याआधी मुसाला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी उपस्थितांना धक्काच बसला होता. न्यायालयाने मुसाला ५०,००० रुपयांचा जामीन मंजूर केला होता. मुसाच्या जामिनाची मुदत शनिवारी संपणार होती. त्यामुळे खान कुटुंबियांनी मुसाला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते. मात्र यावेळी पोलिसांनी मुसाचे नाव `एफआयआर`मधून वगळल्याची माहिती नातेवाईकांना दिली. तसेच कूटूंबातील इतर व्यक्तींवर खटला चालू राहणार असल्याचे देखील सांगितले.