भाजपमध्ये माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही असे दाखवत मोदींनी भपक्याच्या जोरावर भाजपला हायजॅक केले आहे. आता तेच मोदी देश हायजॅक करायला निघाले आहेत. मोदींना देश हायजॅक करून देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज बोपोडीच्या प्रचार सभेत केले.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे, विनायक निम्हण, अनिल भोसले, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर सुनील गायकवाड, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद, माजी आमदार रामभाऊ मोझे, प्रवक्ते अनंत गाडगीळ, दत्ता बहिरट, सनी निम्हण, कैलास गायकवाड आदी नगरसेवक, पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे पुण्याचे नेते शंकरभाऊ तडाखे आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ही निवडणूक फार महत्वाची आहे.
पुढच्या पाच वर्षासाठी सत्ता कोणत्या विचारांच्या हातात द्यायची? शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारवर काम करणा-यांच्या की हुकूमशाही पद्धतीने वागणा-या जातीयवाद्यांच्या हातात सत्ता द्यायची हे मतदारांनी ठरवून येत्या 17 तारखेला मतदान करायचे आहे. या जातीयवाद्यांचे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसने एकत्रितपणे स्वीकारले आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मार्केटिंग, प्रचाराचा भपका करत भाजपवाले मोदीना पुढे करत आहेत असे सांगून ते म्हणाले, ज्या नेत्यांनी शून्यापासून सत्तेपर्यंत पक्षाला नेले त्या जसवंतसिंग, मुरलीमनोहर जोशी या सारख्या नेत्यांचा अपमान मोदी करतात. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला देशाचा इतिहास माहिती नाही ही खेदाची बाब आहे. विकासाबद्दल गुजराथ मॉडेल श्रेष्ठ आहे असे मोदीनी सांगितल्यावर मी तज्ञांकडून त्याच तपासणी केली आणि महाराष्ट्राची तुलना केली. त्यात प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र पुढे असल्याचे लक्षात आल्यानेच या मुद्यावर खुली चर्चा करण्याचे आव्हान मोदीना दिले आहे.
प्रचाराच्या भपक्याला भुलून न जाता काँग्रेसला विजयी करा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मुख्यमंत्र्यांचे वर्णन स्वच्छ चारित्र्याचे आणि राज्याला शास्त्रशुद्ध दिशा देणारे असे केले. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशाला विकासासाठी धर्मांध जातीयवादी शक्तींची नाही तर आंबेडकरांच्या विचाराने काम करणा-या आघाडी सरकारची गरज आहे.डॉ. विश्वजीत कदम, महापौर चंचला कोद्रे, आमदार दिप्ती चवधरी, शंकर तडाखे यांनीही मनोगत व्यक्त केले.