सोल -दक्षिण कोरिया अमेरिकेच्या सहाय्याने येत्या २५ एप्रिलपासून संयुक्त लष्करी सराव करत असून युद्धासाठीच्या तयारीचे हे पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरियाकडून वारंवार दक्षिण कोरियाला युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत तसेच त्याच्या सम्रुद किनार्यावरील विवादास्पद भागात उत्तर कोरिया रॉकेट डागत आहे. या पार्श्वभूमीवर या सरावाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेबरोबर वर्षातून दोन वेळा असा सराव केला जातो. मॅक्स थंडर या नावाने होणार्या या सरावात १०३ विमाने आणि १४०० सैनिक सहभागी होणार आहेत. द. कोरियाची एफ १६ जेट फायटर्स व अमेरिकन एअरफोर्सची एफ १५,एफ १६ तसेच अमेरिकी नौसेनेची एफ ए १८, इए १८ एअरक्राफ्ट या सरावात सहभागी होणार आहेत. कोरिया द्विपात वाढत असलेल्या तणावामुळे असा सराव गरजेचा असल्याचेही सांगितले गेले आहे.
दक्षिण कोरियाने उत्तर कोरियावर कांही दिवसांपूर्वी समुद्राजवळ ३० रॉकेट डागल्याचा दावा केला असून या दोन्ही देशातील सीमा निश्चित झाली आहे मात्र उत्तर कोरियाने ती मान्य केलेली नाही.