इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे बुधवारी दुपारी झालेल्या एका स्फोटामध्ये २३ लोक जागीच मारले गेले तर अनेक लोक जखमी झाले. इस्लामाबादच्या सब्जी मंडी भागामध्ये एका मोठ्या शॉपिंग सेंटरमध्ये हा स्फोट झाला. पंजाब प्रांतातून मागवण्यात आलेल्या काही फळांच्या पेटार्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बच्या सहाय्याने हे स्फोट घडवण्यात आले.
या बाजारामध्ये प्रचंड गर्दी उसळली असतानाच्या वेळीच हा प्रकार घडला. त्यामुळे प्राणहानीही जास्त झाली आणि ५० पेक्षाही अधिक लोक जखमी झाले. पाकिस्तान इन्सिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या शवागारात पत्रकारांनी २३ प्रेते पाहिली. रुग्णालयाच्या अधिकार्यांनीही २३ जण मरण पावल्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आणि ५० पेक्षाही अधिक लोक जखमी असल्याचे सांगितले.
या घटनेचे वृत्त कळताच पोलीस धावले आणि त्यांनी या भागाला वेढा दिला. त्यांनी घटनास्थळावरून ५० किलो स्फोटके हस्तगत केली. या स्फोटामागे तालिबानी संघटनेचा हात असावा असा अंदाज आहे. परंतु हे वृत्त प्रसिध्द करण्याच्या वेळेपर्यंत तरी कोणत्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी घेतली नव्हती.