वॉशिंग्टन पोस्टने केली मोदींची पाठराखण

वॉशिग्टन – अमेरिकेतील प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह वृत्तपत्र वॉशिग्टन पोस्ट ने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर संपादकीय प्रसिद्ध केले असून त्यात मोदींना कांही सल्ले दिले आहेत.

या संपादकीय मध्ये भारताला मोदींच्याच मार्गाने जाण्याची गरज असल्याचे म्हटले गेले आहे त्याचबरोबर मोदींनी केवळ बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा असा सल्लाही दिला गेला आहे. मोदी ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत त्यानुसार त्यांनी विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे व मुस्लीम द्वेष सोडला असल्याचे दिसून येते असेही यात म्हटले गेले आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यास धार्मिक तेढी वाढतील हे अनुमान चुकीचे असून भाजपचे सरकार प्रथम १९९८ साली सत्तेवर आले तेव्हाही अशीच शंका व्यक्त केली गेली होती असे नमूद करतानाच भारतीय राजनितिक संस्कृती असा उन्माद घडू न देण्यास पुरेशी सक्षम असल्याचेही या लेखात म्हटले गेले आहे.

मोदींना विरोध सोडून ओबामा यांनी मैत्रीचा हात पुढे केल्याबद्दल या लेखात कौतुक करण्यात आले आहे. मोदी हे करिश्मा असलेले आणि कठोर परिश्रम करणारे नेते असून त्यांच्यामुळे भारत बदलेल असे सांगतानाच मोदींमध्येही कांही दोष आहेत पण त्यांच्यात सकारात्मकता अधिक आहे असेही या लेखात म्हटले गेले आहे. प्रथम शौचालय मग देवालय या मोदींच्या घोषणेचा उल्लेख करून मोदींची सांप्रदायिक भूमिका बदलली असल्याचे अनुमानही यात काढले गेले आहे. मोदींच्या कारभारात भारतीय अर्थव्यवस्था चांगली गती पकडेल असाही सूर या लेखात लावला गेला आहे.