सोनिया अमेरिकी न्यायालयात पासपोर्ट देणार नाहीत

१९८४ च्या शीख दंगलीसंदर्भात अमेरिकी कोर्टाने मागणी केली असली तरी सोनिया गांधी त्यांचा पासपोर्टची कॉपी न्यायालयात सादर करणार नसल्याचे समजते. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने त्यांना पासपोर्टची कॉपी न देण्याचे आदेश दिले असल्याचे सोनियांचे वकील रवि बत्रा यांनी न्यायाधीश ब्रायन कोगन यांना सांगितले असून तशा आशयाचे सोनियांचे पत्र न्यायालयाला सादर केले आहे. बत्रा म्हणतात की सोनियांकडे लपविण्यासारखे कांही नाही. त्या केस लढविण्यास तयार आहेत. शीख दंगलीत सामील असलेल्या काँग्रेस नेत्यांना सोनिया पाठिशी घालत आहेत असा सिख फॉर जस्टीसचा दावा असून त्यासंदर्भातच हे समन्स सोनियांना बजावले गेले होते.

या संदर्भात केस दाखल करणार्‍या सिख फॉर जस्टीस संस्थेने मात्र सोनियांना समन्स पाठविले तेव्हा त्या न्यूयॉर्क मेमोरियल स्लोयन केटरिंग फॉर कॅन्सर सेंटरमध्ये चेकअप साठी दाखल होत्या असा दावा केला आहे. तर सोनियांनी २ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या काळात त्या अमेरिकेत नव्हत्या असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र याची खात्री पटविण्यासाठी न्यायाधीशांनी सोनियांना त्यांच्या पासपोर्टची कॉपी न्यायालयाला देण्याविषयी आदेश दिले होते. या संदर्भात न्यायालयाने सोनियांना १० जानेवारी रोजी न्यायालयात हजर होण्यासाठी आदेश दिले होते तेव्हाही त्या गेल्या नव्हत्या.