विदर्भातील ११जागांसाठी तिरंगी मुकाबले

नागपूर – महाराष्ट्रातला मागासलेला भाग म्हणून गणल्या जाणार्‍या विदर्भातील लोकसभेच्या ११ जागांसाठी १० एप्रिलला मतदान होणार असून या निवडणुकीचा प्रकट प्रचार ८ एप्रिलला संपला आहे. या ११ जागांसाठी भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भारिप बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विलास मुत्तेमवार, मुकुल वासनीक यांच्यासह अनेक दिग्गज मैदानात उतरलेले आहेत.

एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या विदर्भात २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युतीला पाच आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाच अशा समसमान जागा मिळाल्या होत्या. आता मात्र भाजपा-शिवसेना युतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या गटाला जवळ केले असल्यामुळे आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेशी युती केली असल्यामुळे भाजपा सेनेचे बळ वाढविण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता आहे. 

विदर्भातील मतदारांमध्ये दलित मतदारांची संख्या मोठी आहे. त्याशिवाय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने विदर्भात अनेकवेळा कापसाच्या दराच्या मागणीसाठी व्यापक आंदोलन केली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलने यांचा प्रभाव विदर्भात मोठा आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या मन:स्थितीचा आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या दुरवस्थेचा फटका कॉंग्रेसला बसू शकतो. 

नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी, विलास मुत्तेमवार आणि अंजली दमानिया यांच्यात तिहेरी लढत होत आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात अंजली दमानिया यांनी अरविंद केजरीवाल यांचा रोेड शो करून मोठी धमाल उडवून दिली, परंतु विरोधकांवर निराधार आरोप करणे यापेक्षा त्यांच्याकडे वेगळे काहीच नाही हे दिसून आल्यामुळे त्यांचा प्रभाव ओसरला असून त्या निवडणुकीत मागे पडल्या आहेत. 

नितीन गडकरी हे पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत आणि एकूण सात लोकसभा निवडणुका लढविणार्‍या विलास मुत्तेमवार यांच्याशी संघर्ष करत आहेत. सगळ्याच पक्षात मित्र असलेले नितीन गडकरी यांचे पारडे जड वाटत असले तरी नागपूर लोकसभा मतदारसंघातील २८ टक्के दलित मतदार आणि १८ टक्के मुस्लीम मतदार ही त्यांची अडचण ठरणार आहे. दलित मतदारांपैकी किती टक्के मते बहुजन समाज पार्टीला मिळतात यावरच नितीन गडकरी यांचा विजय अवलंबून राहणार आहे. 

भंडारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आपल्या अवाढव्य आर्थिक साधनांनिशी आणि केलेल्या विकास कामांच्या जोरावर मैदानात उतरले आहेत. भारतीय जनता पार्टीचे आमदार नाना पटोळे हे त्यांच्याशी मोदी लाट आणि जातीय समीकरण या दोन घटकांच्या साह्याने टक्कर देत आहेत. गणिते कशीही असली तरी या भंडारा-गोंदिया मतदारसंघात बहुजन समाज पार्टीचे संजय नाटे दलितांची किती मते खातात यावरच नाना पटोळे यांचे जातीय समीकरण अवलंबून राहणार आहे. 

रामटेक मतदारसंघ हा कॉंग्रेसचे मुकुल वासनिक यांचा मतदारसंघ. मुकुल वासनिक हे दिल्लीतल्या नेत्यांशी थेट संपर्क असणारे कॉंग्रेस नेते असल्यामुळे मतदारसंघात त्यांचे वजन आहे, पण निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे ढुंकूनही न पाहणारे खासदार अशी त्यांची ख्याती असल्यामुळे त्यांना यावेळी निवडणूक जड जाणार आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाणे हे जनसामान्यांचे नेते मुकुल वासनिक यांच्या विरोधात उभे आहेत. मात्र याही मतदारसंघात बहुजन समाज पार्टीच्या किरण पाटणकर या मुकुल वासनिक यांच्या मतांचा लचका तोडणार आहेत. गेल्या निवडणुकीत बसपाचे प्रकाश टेंभुर्णे उभे होते आणि त्यांनी ६५ हजार मते घेतली होती. या गोष्टीला या निवडणुकीत मोठे महत्व दिले जात आहे. 

अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर हे प्रतिष्ठेची लढत देत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे संजय धोत्रे यांनी गेल्या दोन निवडणुकांत जिंकलेला हा मतदारसंघ आपल्या हाती यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेस निष्प्रभ झाली आहे. १९८४ साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या भावनिक वातावरणात कॉंग्रेसचे मधुसुदन वैराळे या मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हापासूनच्या तीस वर्षात कॉंग्रेसला ही जागा जिंकता आलेली नाही. १९८९, ९१ आणि ९६ या तीन निवडणुकांत ही जागा भाजपाने जिंकली. १९९८ आणि ९९ या दोन निवडणुका आंबेडकरांनी जिंकल्या आणि २००४ साली पुन्हा भाजपाने ही जागा जिंकली. विदर्भातल्या विविध मतदारसंघांमध्ये जातीय समीकरणे फार प्रभावी आहेत. परंतु या निवडणुकीत मोदी फॅक्टर मोठा प्रभावी ठरेल असे दिसत आहे.