मानव संसाधन तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर देशात स्थिर सरकार आले तर २० लाख नव्या नोकर्या उपलब्ध होऊ शकतील. २०१४ सालात भारतीय उद्योग कंपन्यांची परिस्थिती पाहता त्यांना सध्याच १२ ते १४ लाख कर्मचार्याची भरती करणे आवश्यक ठरणार आहे. त्यातून स्थिर सरकार आले तर ही संख्या वाढून २० लाखांवर जाण्याची मोठी शक्यता आहे.
गेल्या वर्षातही भारतीय कंपन्यांतून १० लाख नवीन नोकर्या उपलब्ध झाल्या होत्या मात्र आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांना कामगार कपात करावी लागली होती. सध्या निवडणुकांमुळे मिडिया, पीआर, प्रोग्रॅम मॅनेजर, मार्केट सर्च, सोशल मिडिया या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत मात्र त्या ताप्तुरत्या स्वरूपाच्या असू शकतात.
देशातील निवडणुकांचे १६ मे रोजी निकाल येणार आहेत. त्यानंतर मात्र रोजगाराच्या संधी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे एचआर सल्लागार फर्म टीमलिज सर्वीसेसचे उपाध्यक्ष रितुपर्ण चक्रवर्ती यांचे म्हणणे आहे. ग्लोबल हंटचे प्रमुख सुनील गोयल यांनीही चक्रवर्ती यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला असून देशात स्थिर सरकार आले तर रोजगारात ३० ते ४० टक्के वाढ होईल असे सांगितले आहे.