राज्यात काँग्रेस ३५ जागा जिंकेल – नारायण राणे

मुंबई- राज्यात लोकसभेच्या ३५ जागा काँग्रेस जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आणि मनसेच्या वैयक्तिक वादांमुळे जनता त्यांच्यापासून दूर जाईल आणि त्याचा फायदा हा काँग्रेसलाच होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गांधी भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना आणि मनसेच्या नेतृत्वाकडून एकमेकांवर होत असलेली टीका ही वैयक्तिक स्वरूपाची आहे. त्यांच्या या वादात आपल्याला रस नाही. हे एक घरगुती भांडण आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसलाच फायदा होणार आहे. 

ज्या लोकांना आपले घर सांभाळता येत नाही, जे लोक घरातलेच प्रश्न चव्हाटयावर आणतात, अशा लोकांना मत देताना जनता दहा वेळा विचार करेल. ती त्यांना कधीही मतदान करणार नाही आणि काँग्रेसलाच मतदान करेल, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला. सुरुवातीला काँग्रेसला ३१ जागा मिळतील असे वाटत होते. मात्र, आता त्या जागा वाढून ३५ होतील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. नरेंद्र मोदींची तयार केलेली दिखाऊ लाट आता ओसरत असून, काँग्रेस विजयाची हॅटट्रिककरणार, असा विश्वासही राणे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपकडे आता कोणतेही मुद्दे नाहीत. त्यामुळे ते काँग्रेस नेत्यांवर टीका आणि आरोप करत आहेत. काँग्रेस मात्र विकासाच्या मुद्दयावरच निवडणूक लढवत आहे. 

केंद्राने आणि राज्य सरकारने केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्या उलट नरेंद्र मोदींकडचे मुद्देच संपले आहेत. उमा भारतींसारख्या नेत्याही त्यांच्यावर टीका करत आहेत. मोदी विकास पुरुष नाही तर विनाश पुरुष असल्याचेही उमा भारती बोलल्या होत्या, असे त्यांनी यावेळी सांगितले. मोदींच्या खोटया आणि दिशाभूल करणा-या वक्तव्यांमुळे ते उघडे पडत असल्याचेही ते म्हणाले.