मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना लायकी नसताना ‘सुपा’एवढे दिले, ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सूपचे बिल जाहीर सभांमधून फडकवतात, हा निलाजरेपणाच नाही का?, असा खणखणीत सवाल करत शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पापांवर आणि अघोरी कारभारावर कोरडे ओढत शिवसेनेनं रान पेटवलं आहे. पण, वडे आणि चिकन सूपवाले या वणव्यावर पाणी ओतून काँग्रेसवाल्यांना मदत करत आहेत, अशी सणसणीत चपराकही ‘सामना’च्या अग्रलेखातून लगावण्यात आली आहे. त्यावरून ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा वाक् युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सगळ्याच पक्षांचे नेते एकमेकांवर तुटून पडलेले असताना, राज आणि उद्धव ठाकरे यांनी कुटुंबकलहच चव्हाट्यावर आणला आहे. वृत्तपत्रातून ‘टाळी’ मागण्याऐवजी, फोन केला असता तर चर्चा झाली असती, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पुण्याच्या सभेत लगावला होता. मनसेला सोबत घेण्याची शिवसेनेची इच्छाच नसल्याचंही त्यांनी सुनावलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना, राज यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. त्यावरून राज भलतेच खवळले होते. ‘मातोश्री’वर बाळासाहेबांना तेलकट वडे दिले जात होते. ते पाहून मी त्यांना चिकन सूप पाठवण्यास सुरुवात केली आणि अखेरपर्यंत ते मी पाठवलेलं चिकन सूपच पीत होते, असा भावुक किस्सा सांगून त्यांनी उद्धव यांची नाचक्कीच केली होती. त्यांच्या या जळजळीत टीकेचा आज ‘सामना’तून समाचार घेण्यात आला आहे.