दिल्लीच्या जामा मशिदीचे इमाम हे पूर्वी कोणाला फारसे माहीत नव्हते. ते १९७७ साली आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत सर्वांना माहीत झाले कारण आणीबाणीत संजय गांधी यांनी दिल्लीतल्या मुस्लिमांच्या घरांवरून बुलडोझर फिरवले होते. त्याची चीड कोणी बोलून दाखवत नव्हते पण इमामांनी ती बोलून दाखवली आणि उत्तर भारतातल्या मुस्लिम मतदारांना एक संकेत मिळाला. त्यांनी कॉंग्रेसच्या विरोधात मतदान करून तिचा मोठा पराभव घडवून आणला. आता या पदावर त्या इमामांचे चिरंजीव आहेत. आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत आणि नंतरही अनेकदा ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, हे इमाम म्हणजे समस्त मुस्लिमांचे नेते नाहीत. त्यांनी १९७७ साली पूर्ण भारतातल्या मुस्लिमांची चीड व्यक्त केली. पण नंतरच्या काळात सारे सेक्युलर नेते मुस्लिमांच्या मतांची याचना करण्यासाठी जामा मशिदीत जाऊन इमामांची मनधरणी करीत असतात. तो मार्ग काही समस्त मुस्लिमांची मते मिळवून देणारा नाही पण सोनिया गांधी यांनीही डोळे आणि डोके बंद ठेवून परंपरेप्रमाणे काल इमामांची भेट घेतली आणि पाठींबा मागितला. त्यांनीही सारे मुस्लिम आपले ऐकतात असा आविर्भाव आणून त्यांना पाठींबा जाहीर केला.
अशा प्रयत्नांचा कसलाही फायदा सोनिया गांधी यांनाही होणार नाही आणि देशालाही होणार नाही. सध्याच्या निवडणूक प्रचारात जातीयवादाचा मुद्दा बाजूला पडून सारी निवडणूक विकासाच्या मुद्यावर होत आहे पण अशा मार्गांनी सोनिया गांधीच या निवडणुकीला जातीय रंग देत आहेत. असा रंग देतानाच त्या सेक्युलॅरिझमचा जप मात्र करीत आहेत.त्यांनाच या निवडणुकीला जातीय रंग देण्याची गरज का पडली ? याचा इतिहास पाहिला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदी यांचे नाव जाहीर झाले तेव्हाच ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होईल अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत होती. मुस्लिम समाजात मोदींविषयी आणि त्यांच्या नावाविषयी तीव्र नाराजी आहे. त्यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाले की, देशातली मुस्लिमांची मते आपोआप आपल्या मागे येतील असा त्यांचा विश्वास होता. मोदींचे नाव जाहीर होताच कॉंग्रेसचे नेते, आपण आता निवडणूक जिंकल्यातच जमा आहे अशा आविर्भावात होते पण तसे झालेच नाही. भाजपाने मोदींचे नाव जाहीर केले पण निवडणूक जातीयवादावर जाईचना. मोदी हिंदुत्व बोलेनात. त्यांनी सारी निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आणली. मग मोदी हिंदुत्व सांगत नसतील तर मुस्लिमांना भीती कोणाची दाखवायची असा प्रश्न कॉंग्रेसला पडला.
कॉंग्रेसची पंचाईत झाली. मोदी निवडणुकीत जातीयवाद आणेनात म्हणून आता कॉंग्रेसनेच तो आणायला सुरूवात केली. कारण हिंदू-मुस्लिम वाद ही कॉंग्रेसची मोठीच गरज आहे. म्हणून कॉंग्रेसचे नेतेच त्यांना हिंदुत्वाची आठवण करून द्यायला लागले आहेत. आपण सतत हिंदू-मुस्लिम वादाची आठवण करून दिल्यास तरी हिंदुत्ववादी मोदींचा संयम संपून ते कधी तरी हिंदुत्ववादावर येतील अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना होती. कारण तसे झाले तरच मुस्लिमांना भाजपाचा धाक दाखवता येतो. तसे काही होईना म्हणून १९९२ सालच्या बाबरी ढॉंचा पाडतानाची एक सीडी कोब्रा पोस्टच्या नावावर काढली गेली आणि भाजपानेच बाबरी ढॉंचा पाडला असा आरोप लावण्यात आला. या सीडीच्या माध्यमातून भाजपाच्या नेत्यांना उचकवता येईल असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत होते पण हा प्रकार त्यांच्याच अंगलट आला. या अयोध्या प्रकरणाची आता न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा वेळी त्या खटल्यात पुरावा म्हणून वापरता येईल अशी ही चित्रफित बाहेर माध्यमातून दाखवणे हा न्यायालयाचा अपमान ठरतो. दुसरी बाब म्हणजे या सीडीतून काही सिद्ध होतच असेल तर ती न्यायालयात सादर करून तिच्या आधारे भाजपाचे माप त्याच्याच पदरात का टाकले नाही असा प्रश्न उपस्थित झाला.
आता मुस्लिमांची मते मिळवण्याची काहीच सोय राहिली नाही असे दिसायला लागल्यावर सोनिया गांधी यांनी त्या मतांसाठी प्रयत्न करायला सुरूवात केली. त्यांनी दिल्लीच्या जामा मशिदीच्या इमामासमोर पदर पसरला. त्यांनीही हो ना करीत आता कॉंग्रेसला पाठींबा जाहीर केला आहे. मुळात हे इमाम म्हणजे काही देशातल्या सार्या मुस्लिमांचे एकमेव नेते नाहीत. त्यांच्या म्हणण्याला एक लहान वर्ग वगळता कोणी मान देत नाही. त्यांनीही कॉंगे्रसला मते देण्याचा फतवा काढलेला नाही तर आवाहन केले आहे आणि तेही काही अटींवर केले आहे. सोनिया गांधी यांना इमामांसमोर नाक घासण्याचा फारसा फायदा होणार नाही पण त्याचा तोटा मात्र मोठा होणार आहेे. एखाद्या धर्मगुरूसमोर मतांची भीक मागणे हे धर्मनिरपेक्षतेत बसत नाही. पण आता हताश झालेल्या सोनिया गांधी तो दोष पत्करून इमामाला शरण गेल्या आहेत. त्यातून मुस्लिमांची मते काही मिळणार नाहीत पण हिंदूंची मते मात्र जातील. मोदींनी एका शब्दानेही हिंदुत्वाची चर्चा न करता हिंदू समाज आपोआपच त्यांच्या मागे एकत्र येईल. म्हणजे सोनिया गांधी इमामांना शरण जाऊन आपला नाही तर मोदींचा फायदा करून देत आहेत. राजकारणात डावपेच कसे आखावेत याबाबतचे त्यांचे अडाणीपण त्यांच्या अशा आत्मघातकी डावपेचातून व्यक्त होत आहे.