अमेरिकी कंपन्यांतून भारतीय वरचढ झाल्याने चीन अस्वस्थ

वॉशिग्टन- अमेरिकी कंपन्यांमधून भारतीय वंशाच्या लोकांना मिळत असलेल्या महत्त्वाच्या पदांमुळे चीन मध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरत असल्याचे वॉलस्ट्रीटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखपदी सत्या नडेला यांची नियुक्ती चीनच्या बैचैनीस कारणीभूत ठरल्याचे लक्षात आले आहे.

या अहवालात असे नमूद केले गेले आहे की भारतीयांचे इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व आणि पाश्चिमात्य संस्कृतीशी त्यांची जवळीक तसेच प्रगती करण्याची जबर इच्छा यामुळे भारतीय चीनी लोकांच्या तुलनेत भारी पडत आहेत. पेप्सिकोच्या इंद्रा नूयी, ड्श बँकेचा अंशू जैन, मास्टरकार्ड इंकचे अजय बंगा ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. चीनी लोकांच्या तुलनेत भारतीयांची पाश्चिमात्य देशात जाण्याची तयारी अधिक आहे याचाही परिणाम होताना दिसून येत आहे.

अर्थात भारताच्या तुलनेत चीनचा विकास अधिक वेगाने होत असल्याने तेथे चांगल्या संधी नोकरदारांना आहेतच आणि पगारही भारताच्या तुलनेत अधिक आहेत. असे असले तरी अमेरिकी कंपन्यांतून भारतीयच का, चीनी का नाहीत असा सवाल चीनी जनता करते आहे.

मॅकेंझी या सल्लागार कंपनीच्या मते चीनी लोकांचे इंग्रजीवर प्रभुत्व नाही आणि तेथे प्रॅक्टीकल स्कील ऐवजी थेअरी केंद्रीत आधारीत शिक्षण असल्याने भारतीयांच्या तुलनेत चीनी कमी पडत आहेत. मात्र जगावर वर्चस्व गाजविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चीनमध्ये भारतीयांच्या प्रगतीने अस्वस्थता दिसते आहे.