लोकसभा निवडणुकांसंबंधात सध्या जी सर्वेक्षणे केली जात आहेत त्यानुसार भाजप सत्तेवर येण्याची संधी अधिक असल्याचे दिसून येत आहे. तसे झाले आणि मोदी पंतप्रधान बनले तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे पद धोक्यात येईल असे संदेश दिले जात आहेत. महागाईच्या मुद्यावरून राजन यांना भाजप प्रणीत सरकराकडून टार्गेट केले जाईल असे सांगितले जात आहे.
भाजपसाठी आर्थिक रणनिती तयार करणार्या सदस्यांनी पूर्वीपासूनच भाजपला सत्ता मिळाली तर त्यांचा सदस्य रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरपदावर असावा असा आग्रह धरला आहे. राजन यांनी ७ सप्टेंबर २०१३ ला हे पद स्वीकारले आहे. मात्र काँग्रेसच्या सर्व आर्थिक निती अयशस्वी होत असताना ते या पदावर आले आहेत आणि काँग्रेसने आपल्या अयशस्वी नितींचा दोष नेहमीच रिझर्व्ह बँकेवर लादला आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.
५१ वर्षीय राजन काँग्रेस सरकारच्या कालावधीत वित्त मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होते. भाजपचे कोषाध्यक्ष पियुष गांधी यांनी महागाई आणि व्याजदरवाढ यावरून राजन यांना नेहमीच लक्ष्य केले आहे. राजन यांनी पदावर आल्यापासून तीन वेळा रेपो दरात वाढ केली आहे हेही त्यांच्या गच्छतींचे कारण ठरू शकते असे सांगितले जात आहे.
केंद्रीय बँकेच्या ८० वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कधीच रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरना पदावरून हटविले गेलेले नाही. यापूर्वी दोन गर्व्हनरनी सरकारशी मतभेद झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.