पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष

मुंबई: आयकर विभाग मुंबई यांनी निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी आणि अशा व्यवहारांवर नियंत्रण रहावे यासाठी  केंद्रीय नियंत्रण कक्ष आणि जुहू येथे हवाई नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती आयकर महासंचालक (विश्लेषण) सुरेश जंध्याला यांनी दिली. ते आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

परिषदेत बोलतांना ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर निवडणूक खर्चासाठी भेटवस्तू, मतदार खरेदी इत्यादींसाठी उपयोगात येणाऱ्या पैशांचा गैरवापर टाळण्यावर लक्ष केंद्रीत केले असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा प्रसार करण्याचे काम प्रत्येक विभाग करेल. यासाठी आम्ही केंद्रीय राखीव पोलिस दल, रेल्वे पोलिस, सीआयएस प्राधिकरण, बँक संचालक यांचे सहकार्य घेतले आहे.

नियंत्रण कक्षाला माहिती पुरवण्यासाठी सहा सदस्यांची “त्वरित प्रतिसाद चमू”ची स्थापना करण्यात आली असून यामध्ये उपायुक्त, एक आयकर अधिकारी आणि चार-पाच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मोबाईल सेवा एककासह नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवण्यात येईल. निवडणूक आयोगाची आचारसंहितेबाबतची अधिसूचना जारी झाल्यानंतर आयकर विभागाने १०.१३ कोटी रुपयांची राशी पकडली असून परीक्षणानंतर असे लक्षात आले की, हा पैसा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार नव्‍हता. आयकर महासंचालकांनी लोकांना अशी विनंती केली की, अलेखाधारित मोठया प्रमाणावर राशी प्रवासादरम्यान बाळगायची असेल तर त्यासाठी आयकर विभागाने नमूद केलेली पॅनकार्ड, निवडणूक कार्ड, आधार कार्ड, रक्कम नेण्याबाबतचा तपशील इ. महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवणे आवश्यक आहे. यामुळे लोकांचा तसेच आयकर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचेल.

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल आणि बॉम्बे सेंट्रल येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून याद्वारे रात्रंदिवस रेल्वे प्रवाशांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश व्यक्ती रोख रक्कमेपेक्षा दागिन्यांच्या स्वरुपात मोठया प्रमाणावर ने-आण करीत आहेत. यासाठी विमान प्राधिकरण नियंत्रण कक्ष सुध्दा कार्यरत आहे. सुरेश जंध्याला पुढे म्हणाले की, संबंधित संशयित राशीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित १८००२२०११५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२२ २२६२७२७५ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. तसेच विशेष निरीक्षण अधिकारी म्हणून आयकर विभागाचे मुख्य अधिकारी संजय कुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९९६९२३५१३५ आहे.​