मीरपूर: बंगलादेशमध्ये होत असलेल्या ट्वेण्टी-२० विश्वचषकाच्या दुस-या सेमी फायनलमध्ये शुक्रवारी टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचे मोठे आव्हान असणार आहे. मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर होत असलेल्या या लढतीत टीम इंडियाचे पारडे जड असून स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत.
टीम इंडिया व दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सात ट्वेण्टी-२० सामन्यांमध्ये पाचवेळा भारतानेच विजय मिळवला आहे. त्यामुळे आताही धोनी ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलचे तिकिट मिळण्यासाठी प्रयत्न करेल असे वाटते. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी फिट झाला आहे. सरावादरम्यान युवराजच्या डाव्या पायाच्या घोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण युवराज आता फिट असून तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार आहे.
गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर २७ धावांनी मात केली आहे. त्यामुळे त्यांनी ट्वेण्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारताने आजचा सामना जिंकल्यास फायनलमध्ये भारताचा सामना श्रीलंकेशी होईल.