कलम ३७६ ई अंतर्गत तिन्ही आरोपी दोषी

मुंबई- मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये छायाचित्रकार तरूणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी तीन आरोपींना ३७६ ई कलमाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने विजय जाधव, कासिम शेख आणि सलीम अन्सारी या तिघांना दोषी ठरवले आहे. दिल्लीत झालेल्या १६ डिसेंबर २०१२ च्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर न्यायमूर्ती वर्मा समितीने तरतूद केलेल्या या कलमाअंतर्गत दोषी ठरलेले ते पहिले आरोपी आहेत. याप्रकरणी शुक्रवारी निकाल अपेक्षित आहे. 

महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे २२ ऑगस्ट २०१३ रोजी छायाचित्रकार तरुणीवर या नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यापूर्वी याच आरोपींनी जुलै महिन्यात एका टेलिफोन ऑपरेटरवरही बलात्कार केला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींचा छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणातही सहभाग होता. त्यामुळे त्या तिघांना भारतीय दंड विधानातील कलम ३७६ ई अंतर्गत शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकील उज्वल निकम यांनी केली होती. त्याप्रकरणी गुरूवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने या तीन आरोपींना ३७६ ई कलमाअंतर्गत दोषी ठरवले. कलम ‘३७५ ई’नुसार एखादा आरोपी वारंवार बलात्कारसारखा गंभीर गुन्हा करत असेल तर त्याला आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. 

दोन सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरविले. त्यापैकी दोन्ही बलात्कारप्रकरणी विजय जाधव, मोहम्मद अन्सारी आणि कासिम शेख यांना दोषी ठरविले आहे. तर अश्फाक शेख याला टेलिफोन ऑपरेटर तरुणीवरील बलात्कार प्रकरणी, तर सिराज खान याला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी, अशा दोन वेगवेगळया गुन्हयांमध्ये दोषी ठरवले. यापूर्वी सत्र न्यायालयाने टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.