प्राणघातक हल्ल्यातून जनरल मुशर्रफ बचावले

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ हे गुरुवारी प्राणघातक हल्ल्यातून बालबाल बचावले. त्यांच्या वाहनांचा ताफा येण्यापूर्वी 20 मिनिटे त्यांच्या मार्गावर पेरलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. या बॉम्बस्फोटात कोणीही मृत वा जखमी झालेले नाही. 
रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयापासून इस्लामाबादच्या उपनगरातील मुशर्रफ यांच्या निवासस्थानाकडे जाणा-या रस्त्यावर हा बॉम्ब पेरण्यात आला होता. फैजाबाद या रावळपिंडी आणि इस्लामाबाद यांना जोडणा-या परिसरातील एका पुलाखालील पाईपलाईनमध्ये 4 किलो स्फोटकांचा समावेश असलेला हा बॉम्ब ठवण्यात आला होता. गुरुवारी पहाटे 2 वाजता; म्हणजेच मुशर्रफ यांचा ताफा या ठिकाणी येण्यापूर्वी 20 मिनिटे त्याचा स्फोट झाला; अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी लियाकत नियाझी यांनी दिली. या स्फोटामुळे बॉम्ब ठेवलेल्या ठिकाणापासून 2 मीटर अंतरापर्यंतचे पदपथ उखडले गेले आहेत. 


मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानी न्यायालयात देशद्रोहाचा खटला सुरू आहे. सन 1999 ते 2008 या कालावधीत त्यांनी पाकिस्तानचे सर्वोच्च पद उपभोगले. त्यानंतरच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास मात्र न्यायालयाने त्यांना बंदी घातली.मुशर्रफ यांच्यावर करण्यात आलेला हा चौथा प्राणघातक हल्ला आहे. यापूर्वी ते सत्तेवर असताना तीन वेळा त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. तालिबानी अतिरेक्यांकडून मुशर्रफ यांच्यावर आत्मघातकी हल्ला होण्याचे इशारे अनेकवेळा देण्यात आले आहेत.