मुंबई, – गेल्या काही दिवसांपूर्वी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावर निर्णय होईपर्यंत त्यांची मालमत्ता विकण्यास मनाई करावी, अशी याचिका जयदेव ठाकरे यांनी दाखल केली होती. त्याणची सुनावणी हायकोर्टात झाली, यावेळी जयदेव ठाकरे यांनी केलेली मागणी फेटाळून लावत हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना दिलासा दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २0१२ रोजी निधन झाले. त्यांचे मृत्युपत्र प्रमाणित करण्यासाठी सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात प्रोबेट दाखल केले. त्याची तपासणी प्रोथोनोटरीकडे होते. यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने या प्रोबेटचे टेस्टमेंटरी सूट याचिकेत रूपांतर झाले. त्यावर गुरूवारी सुनावणी झाली. त्यावेळी उच्च न्यायालायने जयदेव यांची मागणी फेटाळून लावल्याने उद्धव ठाकरे यांचा ही मालमत्ता विकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात त्यांची मालमत्ता १४ कोटी नमूद केली आहे. बाळासाहेबांच्या मालमत्तेत वाटा नसलेल्या जयदेव यांनी या मृत्युपत्रावरच आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांचा वांद्रे येथील मातोश्री बंगलाच ४0 कोटी रुपयांचा असल्याचा दावा जयदेव यांनी केला आहे. मात्र जयदेव ठाकरेयांनी दाखल केलेला दावा कोर्टाने फेटाळला आहे.