पुतीन लुडमिना यांचा अधिकृत घटस्फोट

मास्को- रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी पत्नी लुडमिना यांना घटस्फोट दिल्याचे क्रेमलिन प्रवक्ते त्रिमिदी पेस्कॉव्ह यांनी आज जाहीर केले. या घटस्फोटामुळे पुतीन यांचे ३० वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे.

गेल्या जूनमध्येच रशियन स्टेट टिव्हीवरील लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये पुतीन आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येत असल्याचे सागितले होते. माजी केजीबी हेर असलेल्या ६१ वर्षीय पुतीन यांनी त्यांचे खासगी आयुष्य नेहमीच गोपनीय ठेवले होते व त्यामुळे त्यांची पत्त्नी आणि दोन मुलींविषयी फारशी माहिती कोणालाच मिळू शकली नव्हती.

ऑलिपिकपटू जिमनॅस्ट अलिना काबायेव्ह या ३० वर्षीय खेळाडूच्या प्रेमात पुतीन पडल्याचे व ते लग्न करणार असल्याचे २००८ पासूनच चर्चेत होते. मात्र या दोघांनीही त्यांच्यात संबंध असल्याचा इन्कार केला होता. विशेष म्हणजे अलिनाचा जन्म १९८३ सालचा असून याच वर्षात पुतीन यांचे लग्न झाले होते. पुतीन यांच्या पुढाकाराने सोची येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धात अलिना टोर्च बेअरर म्हणून सामील झाली होती.