हॅरी पॉटरच्या अद्भूत करामतींनी जगभरातील वाचकांवर अविश्वसनीय भुरळ घातली आहे. हॅरीची टोपी, त्याचा झाडू, चष्मा आणि अदृष्य घड्याळ या कल्पनातीत वस्तूंनी अवघ्यांना मोहून टाकले असतानाच हॅरीचे अदृष्य घड्याळ आता प्रत्यक्षात येऊ घातले आहे. सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील भारतीय वंशाचे सहाय्यक प्रोफेसर देवाशीष चंद्रा यांनी हे अद्भूत घड्याळ बनविण्यात यश मिळविले आहे.
देवाशीष यांनी धातूची अशी एक पट्टी तयार केली आहे, जी प्रकाशाला नव्या दिशेने वळविते. विज्ञानाचा असा सिद्धांत आहे की कोणत्याही वस्तूजवळ येणारा प्रकाश रोखून तो अन्यत्र वळविला गेला तर ती वस्तू डोळ्यांना दिसू शकत नाही. याच सिद्धांताचा वापर त्यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी मेटामटीरियल्स नावानचा कृत्रिम नॅनो सांगाडा करून धातूची थ्रीडी पट्टी तयार केली आहे. यात नॅनो ट्रान्स्फर प्रिटींगचा वापर केला गेला आहे. यामुळे या पट्टीकडे येणारा प्रकाश रोखला जातो आणि तो अन्य दिशेने वळविला जातो परिणामी वस्तू अदृष्य होते.