रायगड जिल्हा हा माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांना मानणारा जिल्हा. या जिल्ह्याने त्यांना निवडून दिले अन मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्याची संधी मिळाली. ते अंतुले आज वयाने थकले असले तरी मनाने आणि विचाराने थकलेले नाहीत हेच त्यांनी उमेदवार जाहीर होत असतानाच दिलेल्या मुलाखतीतून दाखवून दिले आहे.
रायगडची जागा ही काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीत मागच्यावेळी काँग्रेसकडे होती. ती यावेळी राष्ट्रवादीने मागून घेतली सुनिल तटकरे यांच्यासाठी. काँग्रेसनेही ती दिली. पण त्यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अंतुले यांच्याशी चर्चा कऱण्याचे कर्तव्य केले नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यात आज काँग्रेस नावालाही शिल्लक राहिलेली नाही अशी टीकाच अंतुले यानी करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. गेल्या काही वर्षात काँग्रेसची रायगडमधील घोडदौड शेकापने सेनेच्या साथीने रोखली होती. त्यानंतर सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीन ताकद देऊन शेकापकडून जिल्ह्याचा ताबा घेतला आणि यावेळी संधी येताच राष्ट्रवादीची मोहोर उमटवली.
याचा राग अंतुले यांच्या मनात असावा. म्हणूनच त्यांनी थेट काँग्रेसला लक्ष्य केले. त्याच मुलाखतीत राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी दोघेही पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत अशी परखड टिप्पणीही त्यांनी केली आहे. हीच टिप्पणी राष्ट्रवादीला झोंबली असावी कारण अगोदर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नंतर थेट केंद्रीय नेतृत्वावरच अंतुले यांनी हल्लाबोल केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या मतांवर परिणाम करणारीच टिप्पणी असल्याने व ती ऐन निवडणुकीत केल्याने मोठा दणका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसू शकतो. हे ओळखूनच मुख्यमंत्र्यांना साकडे घातले ते अंतुले यांना समजावण्याचे.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते की वयोमानाने फारसे कुठेही न फिरणा-या बॅ. अंतुले यांचे आजही चांगले वजन जनमानसात आहे. घरात बसून जिल्ह्यात काहीही चमत्कार करण्याची क्षमता त्यांची नक्कीच आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री धावतपळत त्यांना भेटायला आले. पण काही उपयोग नाही कारण अंतुलेंचा संदेश घेतलेला बाण सुटल्यानंतरच मुख्यमंत्री त्यांना भेटायला आले. त्यामुळे ही भेट म्हणजे निव्वळ देखावा यापेक्षा वेगळे काहीच नाही असेच म्हणावे लागेल.