पेट्रोल ७५ पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली – सोमवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७५ पैशांची कपात झाली आहे. ७५ पैसे कपातीबरोबरच त्या ७५ पैशावरचे स्थानिक कर आणि मूल्यवर्धित कर सुद्धा कमी होणार आहेत. म्हणजे प्रत्यक्षात लिटरमागे होणारी कपात ही ७५ पैशापेक्षाही जास्त असेल. गेल्या पाच महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रथमच कपात होत आहे. १ मार्चला म्हणजे महिन्यापूर्वीच पेट्रोलचे दर ६० पैशांनी वाढले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात आता पेट्रोलचे दर कमी झाले आहेत, शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपाया वधारला आहे. या दोन गोष्टींचा परिणाम होऊन पेट्रोलचे दर कमी केले गेले आहेत. पेट्रोलचे दर कमी झाले असले तरी डिझेलचा दर मात्र कमी केला जाणार नाही. डिझेल दरमहा दर लिटर ५० पैशांनी महाग केली जात आहे आणि हा क्रम जारीच राहणार आहे.

गेल्या जानेवारीपासून दरमहा ५० पैशांनी डिझेल दर वाढविण्याचा क्रम सुरू झाला आणि त्यामुळे तेल कंपन्यांना डिझेलच्या विक्रीत होणारा तोटा लिटरमागे सहा रुपयांपर्यंत खाली आला आहे. हा तोटा कमी होण्यास रुपयाची किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर यांचाही उपयोग झाला आहे.