
पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे. तिथे कट्टर मुस्लिमांचा राजकारणावर वरचष्मा आहे. पाकिस्तानच्या सरकारी धोरणात अल्पसंख्यकांचे संरक्षण करण्याची संकल्पना मान्य करण्यात आली आहे आणि खास अल्पसंख्य मंत्री नेमला गेलेला आहे पण भारतातल्या अल्पसंख्यांना जीव मुठीत धरून जगावे लागत नाही. पाकिस्तानात अल्पसंख्यकांना जगणे मुष्कील व्हावे इतके त्यांची जगणे असुरक्षित आहे. हिंदू हा पाकिस्तानातला सर्वात मोठे अल्पसंख्य गट आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ठिकठिकाणी विशेषत: सिंध प्रांतात हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले वाढले आहेत. काही ठिकाणी तिथल्या समाजकंटकांनी मंदिरांना आगी लावल्या आहेत आणि काही ठिकाणी मंदिरांतल्या मूर्तींची विटंबना केली आहे. समाजातला एक गट असा उच्छांद मांडत असताना काही लोक सावध आहेत. त्यांनी हे प्रकार होता कामा नयेत असे म्हटले आहे. आपल्या देशात मुस्लिमांनी हिंदूंची पवित्र ठिकाणे भ्रष्ट केली तर त्याची प्रतिक्रिया भारतात उमटेल आणि भारतात मुस्लिमांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली जातील असे त्यांनी बजावले आहे. कारण भारतात हिंदू बहुसंख्य आहेत. तिथल्या हिंदूंनी पाकिस्तानातल्या या घटनांची प्रतिक्रिया म्हणून भारतात काही मशिदी पाडल्या तर त्यांना दोष देता येणार नाही असे त्यांचे मत आहे.
निदान भारतातल्या मुस्लिमांना त्रास होऊ नये म्हणून तरी का होईना पण आपण आपल्या देशात हिंदूंची सुरक्षितता राखली पाहिजे असे त्यांना वाटते. पण पाकिस्तानातले मुस्लिम नेते भारतातल्या मुस्लिमांची काळजी करतात याची कल्पना आपल्याला आाली. खरे तर तशी काळजी करण्याचे काही कारण नाही कारण भारतातले मुस्लिम पाकिस्ताना तल्या हिंदूंच्या एवढे असुरक्षित नाहीत. पण पाकिस्तानचे मुस्लिम सरकार भारतातल्या मुस्लिमांना त्रास होता कामा नये असे म्हणते तरी. तसे भारतातले सेक्युलर सरकार पाकिस्तानातल्या हिंदूंची काळजी करीत नाही. मग या त्रस्त हिंदूचा त्राता कोण ? पाकिस्तानात हिंदूंची अवस्था तर वाईट आहेच पण फाळणीच्या वेळी भारतातून जे मुस्लिम पाकिस्तानात गेले आहेत त्यांचीही अवस्था वाईट आहे. त्यांना पाकिस्तानात जाताना आपण एका मुस्लिम देशात जात आहोत असे समाधान वाटत होते पण त्यांचाही तिथे भ्रमनिरास झाला आहे. मग मुस्लिमांची ही अवस्था तर हिंदूंची अवस्था काय असेल ? देशाची फाळणी झाली तेव्हा भारतात ११ टक्के मुस्लिम होते आणि पाकिस्तानात चार टक्की हिंदू होते. पण आता अवस्था अशी आहे की, भारतातल्या मुस्लिमांचे प्रमाण १२ टक्क्यांवर गेले आहे आणि पाकिस्तानातल्या हिंदूंचे प्रमाण चार टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर खाली आले आहे.
पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात हिंदू लोक अजूनही वस्ती करून आहेत. आता पाकिस्तानची लोकसंख्या १८ कोटी आहे आणि हिंदूंची संख्या ४० लाख आहे. म्हणजे लोकसंख्येमध्ये हिंदूंचे प्रमाण जेमतेम दोन ते सव्वा दोन टक्के आहे. हिंदूंच्याशिवाय पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लीम लोक आहेत. मात्र त्यांच्या धार्मिक श्रध्दा सुन्नी मुस्लिमांपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून सुन्नी मुस्लीम अहमदियांना मुस्लीम मानत नाहीत. त्यामुळे ही जमात तिथे अल्पसंख्य म्हणून राहते. याही समाजावर तिथे हल्ले होतात. मुस्लिम असलेल्यांपैकी शिया मुस्लिम आणि भारतातून तिकडे गेलेले मोहाजीर मुस्लिमही जीव मुठीत धरून जगतात. पाकिस्तानात ख्रिश्चन लोकसुध्दा आहेत. पण ते अगदीच नगण्य आहेत. हिंदू मात्र सर्वात मोठा अल्पसंख्य गट म्हणून ओळखला जातो. पूर्ण पाकिस्तानात ४० लाख हिंदू असले तरी बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांतात त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजावी इतकी आहे. वायव्य सरहद्द प्रांतातून हजारो हिंदूंनी स्थलांतर केलेले आहे. पंजाबमध्ये हिंदू बर्यापैकी संख्येने आहेत पण सिंध प्रांतात त्यांची तुलनेने जास्त संख्या आहे. तरीही तिथे हिंदूंचे जगणे फारशे सुरक्षित नाही. मधूनच एखादे प्रकरण उद्भवते आणि हिंदूंवर हल्ले होतात. मुली पळवून नेऊन त्यांचे धर्मांतर केले जाते.
तिथला बहुसंख्य मुस्लीम समाज थोडासा जागा होतो अशा प्रकारांचा निषेध होतो. अगदी अल्पसंख्यकांना (म्हणजे हिंदूंना)संरक्षण मिळाले पाहिजे असे आवाज मुस्लिम समाजातच उठतात पण ही शांतता काही दिवसांसाठीच असते. नंतर पुन्हा एकदा दुसरे निमित्त निघाले की पुन्हा हल्ले व्हायला लागतात. आता सिंध प्रांतातल्या एक हिंदू पुजार्याने कुराण ग्रंथाची अवहेलना केल्याचे निमित्त मिळाले आणि पूर्ण सिंध प्रांतात हिंदू मंदिरावर हल्ले होण्यास सुरूवात झाली. या पुजार्याने कुराणाची पाने फाडून उकिरड्यावर फेकली असा आरोप आहे. पाने उकिरड्यावर दिसली आहेत पण ती याच पुजार्याने टाकली असल्याचे सिद्ध झालेले नाही पण हे निमित्त करून तिथले अतिरेकी मंदिरांवर हल्ले करायला लागले आहेत. लारकाना आणि कराची या शहरांमध्ये हे हल्ले मोठ्या प्रमाणावर होत आहेत. काही मंदिरे जाळण्यातही आली आहेत. हे सगळे प्रकार १६ ते १८ मार्च दरम्यान घडले. याच दंग्यांमध्ये एक धर्मशाळाही जाळण्यात आली. या घटनेला आठवडा उलटल्यानंतर पुन्हा एकदा सिंध प्रांतातच मंदिरांच्या जाळपोळीला नव्याने प्रारंभ झाला आणि काल लतिफाबाद या शहरात हनुमान मंदिर जाळण्यात आले. २०१२ साली असा एक प्रकार घडला होता. सिंध प्रांतातच १०० वर्षापूर्वीचे जुने मंदिर पाडून टाकण्यात आले होते. असे प्रकार घडले की, हिंदू हतबल होतात कारण तिथले सरकार फार ताकदीने त्यांच्या मागे उभे रहात नाही.