जपान देणार ‘जंबोजेट’ला अखेरचा निरोप

जपान- जगातील विमान कंपन्यांना कमी इंधनात अधिकाधिक प्रवास करणारी विमाने हवी आहेत. त्यामुळे बहुतांशी विमान कंपन्या नवीन विमानांना प्राधान्य देत आहेत. जपानमधील ऑल निप्पॉन एअरवेजने आपल्या ताफ्यातील बोइंग कंपनीचे ‘७४७’ जंबोजेट या विमानाला ३१ मार्च रोजी अखेरचा निरोप देण्याचे ठरवले आहे. हे विमान ओकिनावा येथील नाहा विमानतळावरून टोकियोच्या हनेडा विमानतळावर अखेरचे उड्डाण करेल. या विमानाला अखेरचा निरोप देण्यासाठी जपाननमध्ये मोठी तयारी सुरू आहे. हे विमान ७० मीटर लांब असून ६० मीटर रुंद आहे. या विमानात दोन डेक असून बलाढय़ आकारामुळे अनेक जण या विमानाच्या प्रेमात पडले आहेत. जपानने १९७० मध्ये पहिल्यांदा हे विमान आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या विमानाने चांगली कामगिरी बजावली. 

एकेकाळी जपान एअरलाइन्सकडे १२० जंबोजेट होती. या विमानाची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ५०० आहे. मात्र, १९८५ मध्ये टोकियो ते ओसाका या प्रवासात हे विमान कोसळले. यात ५२४ प्रवासी मरण पावले. जपानच्या हवाई वाहतूक इतिहासात हा सर्वात मोठा अपघात होता. सध्या हवाई क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाने युक्त विमाने तयार होत आहेत. बोइंग कंपनीचे ‘ड्रीमलायनर’ विमान अधिकाधिक इंधन वाचवणारे असून एकाच झेपेत ते मोठय़ा पल्ल्याचे अंतर कापू शकते. हे विमान इतर विमानांच्या तुलनेत हलके आहे. त्यामुळे जगभरातील विमान कंपन्यांनी बोइंगच्या ‘ड्रीमलायनर’ला पसंती दिली आहे.