पुणे – स्वतःवर विश्वास असेल आणि ध्येय्य निश्चित असेल तर आपण कोणताही कठीण प्रसंग निभाऊन नेवू शकतो. नशिब हे आपण स्वतःच लिहीतो. टिकाकारांना भीड न घालता आपल्या जमेच्या बाजू लक्षात घ्या. त्यांच्यामुळेच तुम्ही पुढे जाऊ शकता असे प्रतिपादन रेल्वे अपघातात पाय गमावल्यानंतरही एव्हरेस्ट सर करणारी पहिली तरुण गिर्यारोहक अणुरिमा सिन्हा हिने शुक‘वारी केले.
लाईफ स्कूल फाऊंडेशनच्यावतीने फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोईदानी यांच्या हस्ते अरुणिमाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यावेळी ती बोलत होती. पुणेरी पगडी, एक लाख रूपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी गोईदानी यांनी ‘व्हॉट्स युवर माऊंट एव्हरेस्ट’ याविषयावर मार्गदर्शन केले.
अणुरिमा म्हणाली, ‘तो’ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग होता. रात्रभर 49 रेल्वे जवळून जात असताना केवल आशेच्या एका किरणासाठी मी ती रात्र काढली. त्यावेळी स्थानिकांनी मला वाचवले. रुग्णालयात असतानाच अनेकांनी या अपघाताबद्दल अनेक अफवा पसरवल्या. माझ्या राष्ट्रीय खेळाडू होण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.त्या सगळ्यांना टीकांना उत्तर देण्यासाठीच रुग्णालयात असतानाच एव्हरेस्ट सर करण्याचे ठरवले. तेथून सरळ झारखंडला प्रशिक्षक लक्ष्मी पाल यांच्याकडे गेले. अनेकांनी वेड्यात काढले. मात्र, माझा निश्चय पक्का होता. सुरवातीला सगळ्यात शेवटी मी रहायचे. मात्र काही महिन्यांनंतर मी सर्व प्रशिक्षकांच्या पुढे होते.
अनेक वेळा पायातून रक्तस्त्राव होत असे. मात्र हार मानली नाही. एव्हरेस्ट मोहीमेवर जाताना खरी कसोटी होती. पण स्वतःवर विश्वास आणि ध्येय्य निश्चित होते. त्यामुळे माघार घेतली नाही. साऊथ पोल ते एव्हरेस्ट सबमीटचा तब्बल 28 तासांचा प्रवास अत्यंत खडतर होता. हा प्रवास केवळ स्वतःच्या इछाशक्तीच्या जोरावर पूर्ण केला, ‘तो’ प्रसंग पून्हा घडला तर मी आजही लढायला तयार आहे, असेही तिने सांगितले.