राहुल गांधींनी गारपिटग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसताना, आत्महत्या केलेल्यांना विसरले

विशेष प्रतिनिधी – काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी यांनी आज विदर्भात वर्धा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेला शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते. मात्र भाषणात राहुल गांधी यांनी गारपिटग्रस्तांबद्दल फार भाष्य न करता केवळ पॅकेज दिल्याचे सांगून त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्याचवेळी या संकटांना कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतक-यांचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही.

या सभेत राहुल गांधी हे गारपिटग्रस्तांबद्दल काही तरी ठोस बोलतील अशी शेतक-यांची अपेक्षा होती. पण त्यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांवर आलेल्या दुष्काळ, अतिवृष्टी आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या संकटाचा उल्लेख केला खरा. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवरण करण्यासाठी काय केले तेच सांगितले. तसेच गारपिटग्रस्तांसाठी केंद्राने 800 कोटींचे पॅकेज दिल्याचे सांगत विषय संपवला.

गारपिटग्रस्तांसाठी पॅकेज अन राज्य सरकारच्या मदतीचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला. पण त्याचवेळी ही मदत प्रत्यक्ष आपदग्रस्तांपर्यंत पोचली किंवा नाही आणि पोचली असेल तर किती मिळाली याची साधी चौकशीही त्यांनी केली नाही.

त्यानंतर त्यांनी केवळ राजकीय भाषण करताना मोदींवर निशाणा साधला. गुजरात पेक्षा महाराष्ट्र हेच विकासाचे चांगले मॉडेल असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी राज्य सरकारला दिले. या सभेनंतर अनेक शेतकरी किंवा त्यांच्या मुलांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच गांधी हे ज्या शेतक-यांनी गारपिटीनंतर आत्महत्या केल्या त्या शेतक-यांचा उल्लेख न करता त्यांना राहुल गांधी विसरले असल्याचे एका शेतक-याच्या मुलानेच लक्षात आणून दिले.