विद्यमान खासदारांना अतंर्गत नाराजीचे आव्हान

नगर मतदारसंघातून माजी आमदार राजीव राजळे यांनी मागील वेळी अपक्ष उमेदवार असूनही मोठ्या प्रमाणावर मते घेतली आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले मागे पडून भाजपाच्या दिलीप गांधी यांनी विजय संपादन केला. यावेळी राजळे हेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असून गांधीही पुन्हा मैदानात आहेत. परंतु, आतापर्यंत गांधी यांना पक्ष कार्यकर्त्यांचा आणि युतीतीला साथीदार असलेल्या शिवसेनेचाही भक्कम पाठींबा मिळाला होता. यावेळी मात्र त्यांना पक्षांतर्गत विरोधकांचा आणि नाराज शिवसैनिकांचा सामना करावा लागत आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ पूर्वी दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मात्र, कोपरगावचे नामकरण शिर्डी असे झाल्यावर दक्षिण नगरचेही नामकरण अहमदनगर असे झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपात हा मतदारसंघ सातत्याने राष्ट्रवादीकडे राहीला. मात्र, या पक्षाला तुकाराम गडाख यांचा अपवाद वगळता एकदाही यशाची चव चाखता आली नाही. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर मैदानात उतरलेल्या विद्यमान भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना तिरंगी लढतीचा फटका बसला. आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात पुन्हा उतरलेल्या माजी आमदार राजीव राजळे यांनी मागील वेळी अपक्ष म्हणून मैदान लढवताना तिसर्‍या क्रमांकाची मते खेचली आणि कर्डिले-राजळे यांच्या खेचाखेचीत विजयाची माळ दिलीप गांधी यांच्या गळ्यात पडली.

मागील निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेच्या रणसंग्रामात कर्डिले यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाची कास धरली आणि या पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक जिंकली. मागील वेळी काँग्रेसला रामराम ठोकून लोकसभेच्या मैदानात अपक्ष उमेदवारी करणार्‍या राजळे यांनीही नंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून तेच राष्ट्रवादीतर्फे लोकसभेचे उमेदवार, अशी चर्चा होत राहिली आणि अखेर राजळेंनाच पक्षाने उमेदवारी दिली. भाजपानेही गांधींना पुन्हा उमेदवारी दिली खरी, परंतु त्यांनाही कधी नव्हे ते पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे व माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यासारखे प्रबळ दावेदार भाजपामध्ये तयार झाले आहेत. या सर्वांचा गांधींना पुन्हा उमेदवारी देण्यास ठाम विरोध होता.  भाजपाच्या प्रदेश शाखेकड़ून केंद्रीय स्तरावर पाठवलेल्या यादीत नाव नसताना गांधींना थेट केंद्रीय पातळीवर पुन्हा उमेदवारी कशी काय मिळाली, याचेच या मंडळींना मोठे अप्रूप वाटत आहे. मात्र, आता माघार घ्यायची नाही, असा निर्धार करून गांधींना होता होईल तेवढा विरोध करण्याचा पवित्रा भाजपातील नाराज घटकांनी घेतला आहे. त्यामुळेच दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवताना गांधींना जितके अनुकूल चित्र पक्षांतर्गत पातळीवर होते, नेमके तेवढ्याच पातळीवर प्रतिकूल चित्र आता तयार झाले आहे.

मागील निवडणुकीत (2009) गांधींना 3 लाख 12 हजार 47 मते मिळाली. त्यांचे प्रमुख विरोधक राष्ट्रवादीचे कर्डिले यांना 2 लाख 65 हजार 316, तर अपक्ष राजळे यांना 1 लाख 52 हजार 795 मते मिळाली. अन्य काही अपक्षही त्यावेळी मैदानात होते खरे, परंतु त्यांना नगण्य मते मिळाली. तिरंगी लढतीत मतविभागणीचा नेमका फायदा गांधींना मिळून 46 हजार 731 मतांच्या फरकाने विजयी होत ते दुसर्‍यांचा खासदार झाले. आता होणार्‍या निवडणुकीत भाजपातर्फे गांधी तिसर्‍यांदा उमेदवार असतील. त्यांना राष्ट्रवादीतर्फे प्रथमच व एकूण दुसर्‍यांदा मैदानात उतरलेल्या राजळे यांचे आव्हान तयार झाले आहे. मागील वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार आता भाजपाचे आमदार असून त्यांच्या रूपाने गांधींना किती मते खेचता येतील, याचे औत्सुक्य आहे. 

मागील 24-25 वर्षे नगर शहराची आमदारकी सेनेचे अनिल राठोड यांच्याकडे आहे. नगर शहरातून राष्ट्रवादीला बरेच प्रयत्न करूनही विजय मिळवता आलेला नाही. मात्र, आता बदलत्या समीकरणात राठोड व गांधी यांच्यातून विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. नगर शहरातील महापालिकेच्या निवडणुकीत अलिकडेच याचे प्रत्यंतर आले. एकीकडे गांधींच्या चिरंजीवाने प्रथमच निवडणूक लढवताना विजय मिळवला, तर सलग दुसर्‍यांदा सेनेकडून उमेदवारी करणार्‍या राठोड यांच्या चिरंजीवाला पुन्हा पराभवाची धूळ चाखावी लागली. शहरात आता सेनेची ताकद पूर्वीप्रमाणे राहिली नसल्याचे दिसते. महापालिकेत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. 

महापालिकेतील सत्ता समीकरणात संख्याबळ कमी असूनही मनसेसारख्या पक्षाला सत्ताधार्‍यांनी ताकद दिली. नगर जिल्ह्याच्या उत्तरेत काँग्रेसचे मोठे वर्चस्व असताना दक्षिणेत मात्र काँग्रेसची ताकद कमी आहे. राष्ट्रवादीचा वरचष्माही म्हणावा इतका नाही. दुसरीकडे सेनेची ताकदही मर्यादित असताना भाजपाला तुलनेने चांगले यश मिळत आले आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा भाजपाचा आमदार विजयी झाला. श्रीगोंद्यातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले. राहुरी व पाथर्डी तालुक्यांची विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दोन-तीन तुकड्यांत फाटाफूट झाल्याने या तालुक्यांचे राजकीय अस्तित्व नामशेष झाल्याचे दिसते. कर्डिले राहुरीचे भाजपाचे आमदार आहेत, तर शेवगावमध्ये राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांची सत्ता आहे. मात्र पक्षांतर्गत विरोधकांमुळे ही निवडणूक गांधी यांच्यासाठी कठीण बनली आहे.