मोनॅश – जगातील विविध देशात भारतीय लोक नोकरी व शिक्षणासाठी जात असतात. शिक्षणासाठी गेलेले भारतीय लोक तेथेच स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांमध्ये भारतीय लोकांनी उच्चशिक्षण घेऊन चांगली प्रगती केली आहे. अनेक भारतीय व्यक्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदांपर्यंत पोहोचले आहेत. या अनिवासी भारतीयांचा भारतात मोठा गवगवा होतो. मात्र त्या देशांमध्ये स्थानिक नागरिकांमध्ये भारतीय व्यक्तींविषयी असूया निर्माण होते. याचा फटका भारतीयांना बसतो. ऑस्ट्रेलिया हा जगातील संपन्न देश आहे.
अमेरिका, इंग्लंड पाठोपाठ भारतीय लोक या देशात स्थायिक होण्यासाठी जातात. सध्या ऑस्ट्रेलियात राहणा-या भारतीयांना वेगळीच समस्या भेडसावत आहे. या देशात राहणा-या स्थलांतरितांना सापत्न वागणूक मिळत आहे. विशेषत: वर्णभेदाचा मोठा फटका त्यांना बसत आहे. कोहेशन मॅपिंग सोशल रिसर्च संस्थेने ऑस्ट्रेलियातील भारतीयांवर होणा-या अन्यायावर संशोधन केले आहे. त्यात भारतीय व श्रीलंकेच्या ४२ टक्के जणांना सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचे आढळले आहे. यात भेदभावपूर्ण वागणूक मिळणा-या यादीत मलेशियाचे नागरिक पहिल्या क्रमांकावर आहेत. जवळपास ४५ टक्के मलेशियन नागरिकांना भेदभावाचा सामना करावा लागतो. सिंगापूर (४१ टक्के), इंडोनेशिया (३९ टक्के), चीन-हॉँगकॉँग (३९ टक्के) असे सापत्नभावाचे प्रमाण आहे.
वर्णभेदाबरोबरच धर्म आणि वंश आदींचा फटका या स्थलांतरितांना बसतो. मात्र, जगभरातून ऑस्ट्रेलियात आलेले ८० टक्क्याहून अधिक स्थलांतरितांनी ऑस्ट्रेलियातील जीवनाबद्दल समाधान व्यक्त केले, असे संस्थेने अहवालात म्हटले आहे. मोनॅश विद्यापीठातील अॅँड्रय़ूस मार्कुस आणि स्कॅलॉन फाउंडेशनने गेल्या दशकात ऑस्ट्रेलियात आलेल्या स्थलांतरितांच्या अनुभवांचा अभ्यास केला. विशेषत: सिडनी व मेलबर्न येथील स्थलांतरिताच्या अनुभवावर संशोधन केले. जवळपास २३०० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
१९९० ते २०१० या काळात ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या उच्चशिक्षित आणि कौशल्य असलेल्या स्थलांतरितांचा समावेश होता. तसेच २००० ते २०१० या काळात १० पैकी ४ स्थलांतरित हे इंग्रजी भाषा न जाणणारे होते. या स्थलांतरितांचे प्रमाण ४१ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे, असे सर्वेक्षणात आढळले. ऑस्ट्रेलियातील एकूण स्थलांतरितांच्या लोकसंख्येत चीनमधून ९२टक्के, भारत-श्रीलंका ८९ टक्के, दक्षिण आफ्रिका व झिम्बाम्बे ८८ टक्के, ऑस्ट्रेलियातून ७६ टक्के आणि अमेरिका व कॅनडातून ७६ टक्के नागरिकांचा समावेश आहे. स्थलांतरित नागरिकांना ऑस्ट्रेलियन व्यक्ती या प्रेमळ, काळजी घेणा-या वाटत घेत नसल्याचे आढळले आहे.