मुंबई – खाते नसलेल्यांनाही एटीएम मधून पैसे काढता येण्याची सुविधा देणारी बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक बनली आहे. कांही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ज्या लोकांकडे बँक खाते नाही त्यांनाही एटीएम मार्फत पैसे काढण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बँक ऑफ इंडियाने ही सेवा सुरू केली आहे.
बँकेचे अध्यक्ष व्ही.आर. अय्यर म्हणाले की सध्या ही सेवा कांही ठराविक एटीएम केंद्रावर सुरू असली तरी येत्या २० दिवसांत ती सर्व केंद्रांवर सुरू होईल. त्यासाठी इमिजिएट मनी ट्रान्स्फर सेवा या केंद्रांवर दिली गेली आहे. त्यानुसार ज्यांना पैसे काढायचे आहेत ते पैसे पाठविणार्या खातेदाराच्या मोबाईल नंबरचा उपयोग करून पैसे काढू शकतील. पैसे पाठविणारा इंटरनेट बँकींगच्या माध्यमातून पैसे पाठवू शकतो. व ज्याला पैसे काढायचे आहेत त्याला डेबिट कार्ड शिवाय पैसे काढता येतील. ज्याच्या खात्यातून रक्कम काढली जाईल त्याना मोबाईलवर किती पैसे काढले याची माहिती दिली जाईल.
या सेवेनुसार दर महिन्याला २५ हजारापर्यंतच रक्कम काढता येणार आहे तसेच एकावेळी १० हजार रूपये काढता येणार आहेत. प्रत्येक ट्रान्झॅक्शन साठी खातेदाराच्या अकौंटमधून २५ रूपये कापले जाणार आहेत.