पुणे – गेली तब्बल 22 दिवस सुरु असलेले टेन्शन एकादाचे उतरले. 10वीच्या मराठी माध्यमाच्या परीक्षा आज संपल्या. परंतू इंग्रजी माध्यमाची परीक्षा उद्या संपणार आहेत. गेली वर्षभर असेलेले मुलांचे टेन्शन आज एकदाचे उतरले आणि रिलॅक्स झाल्यासारखे वाटले. त्यामुळे विविध शाळांमधून विद्यर्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता.
दहावीचे वर्ष म्हटले की घोड्याला झापडे लावल्यासारखे सतत एकाच चाकोरीतून जाण्याचे. ना धड एन्जॉय, ना बाहेर फिरणे अशा परिस्थितीत पालकांचे दडपण आणि अभ्यासाचे टेन्शन घेत वर्ष काढावे लागते. मुलांना परिक्षा सुरु होण्याआधीच ती कधी संपते याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. आज अखेर मराठी माध्यमांच्या परिक्षा संपल्या. आता वेध लागतेल ते म्हणजे सट्टीत कुठे कुठे फिरायला जायचे. गेली वर्षभर न केलेले ते सर्व या सुट्टीत अनुभवायचे असेच प्रत्येकाला वाटत होते.
पेपर देण्याची घंटा झाली आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. पेपर कसा गेला या चर्चे पेक्षा आता आपण कुठल्या हॉटेलमध्ये जायचे आणि काय खायचे याची चर्चा मुलांमध्ये रंगत होती. सर्वांचे फेव्हरेट आईस्क्रीम खाण्यासाठी इतके दिवस मनाई होती. परतू आज ती कसर विद्यार्थ्यांनी भरुन काढली. पक्षाला नवीन पंख फुटल्याप्रमाणे आणि झाडाला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे चेहरे टवटवीत झाले होते. आजचा पेपर अवघड गेला असला तरी सुट्टी लागल्याचा आनंद मुले उपभोगत होती. तर परत कधी भेटणार याची हुरहुरही विद्यार्थ्यांच्या मनात होती. खूप मोठे ध्येय ऍचिव्ह केल्याचे समाधान मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.