व्हाईट हाऊस मध्ये अंतर्गत वापरासाठी अनेक स्मार्टफोनच्या सुरक्षा चाचण्या सुरू झाल्या असून त्यात सॅमसंग आणि एल जीचे स्मार्टफोनही सामील असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आत्तापर्यंत अमेरिकेचे सत्ताकेंद्र असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये अध्यक्ष ओबामांसह सर्व व्हाईट हाऊस कम्युनिकेशनसाठी ब्लॅकबेरी स्मार्टफोनचा वापर करत होते. मात्र आता अन्य स्मार्टफोनचा विचारही सुरू झाला आहे. व्हाईट हाऊस इंटर्नल टेक्नॉलॉजी टीम आणि व्हाईट हाऊस कम्युनिकेशन एजन्सीतर्फे या चाचण्या सुरू असल्याचे समजते. या दोन्ही संस्थांकडे अध्यक्ष ओबामा यांच्या कम्युनिकेशन सुरक्षेची जबाबदारी आहे.
संरक्षण विभागाच्या अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी सॅमसंग अथवा एलजीचे स्मार्टफोन वापरात येण्यास अजून दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागेल असेही सांगितले आहे. त्यातून ओबामा त्यांचा ब्लॅकबेरी बदलतीलच असेही नाही असेही सांगितले जात आहे. पेंटॉगोनमधील अधिकार्यांनीही स्मार्टफोन चाचण्या सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ब्लॅकबेरीने मात्र त्यांचेच फोन व्हाईट हाऊसच्या कम्युनिकेशनसाठी सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकन सरकार आणि मोबाईल कम्युनिकेशनच्या गरजा लक्षात घेऊनच ब्लॅकबेरीचे डिझाईन केले गेले आहे. अमेरिकन सरकारच्या उच्च सुरक्षा गरजा या फोनमुळे पूर्ण होत असल्याचाही कंपनीचा दावा आहे. दशकाहून अधिक काळ ब्लॅकबेरीचे फोनच येथे वापरात आहेत.