
मिरपूर- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीतील पहिल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजीकरत पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. विजयाचे हे लक्ष्य भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात आणि नऊ चेंडू राखून पार केले.या विजयासह ‘गट-ब’ मध्ये दोन गुण मिळवून भारताने आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. धवन २४ धावांवर बाद झाल्यानंतर शर्माही ३० धावांवर बाद झाला. या दोघांपाठोपाठ युवराज सिंग केवळ एक धाव काढून बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था तीन बाद ६५ अशी झाली होती. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताला सहज विजय मिळून दिला. त्याआधी शेर बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर सुरु झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कामरान अकमल आणि अहमद शहझाद यांनी पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली.
