सौदी अरेबिया – लोकांकडून पैसे मागून स्वत:ची गुजराण करणा-या भिका-याकडे आपल्याला तुच्छतेने बघण्याची सवय आहे. त्याच्याकडे काय असणार असे आपल्याला कायम वाटत असते. मात्र, सौदी अरेबियात १०० व्या वर्षी मरण पावलेल्या अंध भिकारी महिलेने गेल्या ५० वर्षात जमवलेल्या संपत्तीने सर्वाचेच डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. तिने आपल्या पश्चात कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवली आहे. यात १०,६६,५८० डॉलर्स रोख (आठ कोटी), सोन्याची नाणी, दागिने, रिअल इस्टेटचा समावेश आहे.
आयुष्यभर भीक मागणा-या या महिलेने आपली संपत्ती गरिबांना दान करण्याचे दुर्मीळ दातृत्व दाखवले आहे. ही तरतूद तिने तिच्या मृत्युपत्रात केली आहे. ईशा ही महिला गेल्या ५० वर्षापासून जेद्दा शहरात भीक मागत होती. तिचा घरात नुकताच मृत्यू झाला. त्या वेळी तिने जमवलेली संपत्ती उघड झाली. १०,६६,५८० डॉलर्स, जेद्दा शहरात चार इमारती, २६६,६४५ डॉलर्सची सोन्याची नाणी आणि दागिने आदींचा समावेश आहे. ईशाला आई आणि बहिणीशिवाय कोणीही नातेवाईक नाहीत. तिची आई व बहीणही भीक मागूनच गुजराण करायची, अशी माहिती तिला ओळखणा-या अहमद अल-सईदी याने दिली. इशाने मृत्युपत्र तयार केले होते.
माझ्या मृत्यूनंतर आपली संपत्ती गरिबांना वाटून टाकण्याचे तिने मृत्युपत्रात नमूद केले अशी माहिती सईदी याने दिली. सईदीने याबाबत सौदी अधिका-यांना कळवले मात्र त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. आई व बहिणीच्या मृत्यूनंतर ईशाच्या संपत्तीत अधिकच वाढ झाली. कारण त्यांची संपत्तीही तिलाच मिळाली. प्रचंड संपत्ती मिळाल्यानंतर भीक मागणे सोडण्याचे तिला सुचवले होते. मात्र तिने ते ऐकले नाही. ती अखेपर्यंत भीक मागतच राहिली, असे सईदी याने सांगितले.